मस्साजोगचे तीनही गुन्हे 'सीआयडी'कडे; अजूनही आरोपी मोकाटच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 07:14 IST2024-12-26T07:14:22+5:302024-12-26T07:14:51+5:30
हत्या, खंडणी, मारहाणीच्या गुन्ह्यांचा समावेश

मस्साजोगचे तीनही गुन्हे 'सीआयडी'कडे; अजूनही आरोपी मोकाटच
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तीनही गुन्हे आता 'सीआयडी'कडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातून बीडपोलिसांचा रोल संपला आहे. असे असले तरी मुख्य आरोपी मोकाटच असल्याने संताप व्यक्त आहे. आरोपींच्या अटकेसह कठोर शिक्षेच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मोर्चा काढला जाणार आहे.
जरांगे-पाटील, शरद पवार बीडमध्ये येणार
बीडमध्ये शनिवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यासह सत्ताधारी, विरोधी पक्षातील खासदार, आमदार व इतर नेतेही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या या मोर्चासाठी जिल्हाभरातून नियोजन केले जात आहे.
अधिकाऱ्याला मागितली होती दोन कोटींची खंडणी
६ डिसेंबरला मस्साजोग परिसरातील पवनचक्कीचे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली. ९ डिसेंबरला सरपंच देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोनच दिवसांत याच कंपनीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराडसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आला. अधिवेशनात यावरून गदारोळ आला. त्यानंतर प्रकरणाचा तपास सीआयडी'कडे देण्यात आला होता; परंतु मंगळवारी सायंकाळी उशिरा मारहाण व खंडणीचा गुन्हाही 'सीआयडी'कडे वर्ग केला.
मस्साजोगचे तीनही गुन्हे आता 'सीआयडी'कडे वर्ग झाले आहेत. आरोपी अटकेसाठी जर सीआयडीने मदत मागितली तर आम्ही देऊ. सध्या तरी आमचा हस्तक्षेप नाही. आतापर्यंत जेवढा तपास झाला आणि आरोपी अटक केले ते सर्व 'सीआयडी'कडे दिले आहे. सचिन पांडकर, अपर अधीक्षक, बीड