हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत; रिव्हॉल्व्हर अन् जिवंत काडतूस जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:14 IST2024-12-26T19:14:16+5:302024-12-26T19:14:51+5:30

परळी न्यायालयाने कैलास फड यास एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

Kailash Phad arrested for firing in the air; revolver and live cartridges seized | हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत; रिव्हॉल्व्हर अन् जिवंत काडतूस जप्त

हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत; रिव्हॉल्व्हर अन् जिवंत काडतूस जप्त

परळी : मागील वर्षी दिवाळी दरम्यान परळीच्या  बँक कॉलनीतील घराजवळ वाहन पूजा करत असताना एका तरुणाने रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कैलास फड ( रा. कन्हेरवाडी .हल्ली मुक्काम बँक कॉलनी परळी) याच्या परळी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यास आज दुपारी पोलिसांनी अटक केली. यावेळी गुन्हयातील रिव्हॉल्व्हर, २३ जिवंत काडतूस व २ पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान, फड यास परळी न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

परळी  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विष्णू फड यांनी 23 डिसेंबर रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  होती. पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या सूचने वरून ही  कारवाई करण्यात आली. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी  की, रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायर होत असल्याचा  सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केली त्यात मागील दिवाळीत परळी शहरातील बँक कॉलनी भागातील युवक कार्यकर्ते  कैलास फड यांनी 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी वाहनाची पूजा करत असताना त्यांच्या जवळील रिव्हॉल्व्हर वरच्या दिशेने हवेत फायर केले असल्याचे खात्री पोलिसांना पटली .हवेत फायर करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी पोलीस  अंमलदार विष्णू फड यांना 23 डिसेंबर रोजी सूचना  दिल्या होत्या. व्हिडिओमध्ये  कैलास फड  हा हवेत फायर करत असल्याचा खात्री झाली. त्यामुळे याप्रकरणी 23 डिसेंबर  2024रोजी त्याच्या  विरोधात परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्या नंतर तीन दिवसांनी कैलास फड यास परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती गुरुवारी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी दिली. 

परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अभिलेखामध्ये  जिल्हाधिकारी बीड यांच्या  एका आदेशाने 27 फेब्रुवारी 2023 मध्ये योग्य त्या अटी व शर्तीसह कैलास फड यास शस्त्र परवाना देण्यात आला होता. या अटी व शर्तीचा भंग केला म्हणून कैलास फड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परळीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस बालाजी दराडे ,अंकुश मेंडके यांनी आरोपी कैलास फड यास गुरुवारी सकाळी परळीत अटक केली. त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी परळी न्यायालयाने सुनावली आहे आहे. ही कारवाई बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अंबाजोगाई चे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. 

Web Title: Kailash Phad arrested for firing in the air; revolver and live cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.