न्यायाधीशांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:44+5:302021-02-05T08:23:44+5:30
वडवणी : वडवणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ...

न्यायाधीशांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
वडवणी : वडवणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवर एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून मतदार दिन, बालिका दिन, युवा दिन आणि मराठी भाषा साहित्य, संस्कृती संवर्धन पंधरवडा या विषयांचा आढावा घेण्यात आला.
वडवणी तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित या एकदिवसीय शिबिरात वडवणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एल. एम. पठाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाविद्यालयीन युवक-युवतींनी नियमांचे पालन करावे. आपले चारित्र्य जपावे व व्यक्तिमत्व विकास साधावा, असे आवाहन केले. आपल्यापुढे येणाऱ्या विविध संधींचे सोने करावे, असे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश एल. एम. पठाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वडवणी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर, वडवणी तहसीलदार सय्यद कलीम अहमद, महाविद्यालयाचे अध्यक्ष पंजाबराव मस्के, प्राचार्य डॉ. के. एम. पवार, वडवणी तहसीलचे शेख रफीक आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. के. एम. पवार यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या वाटचालीत महाविद्यालयाचे अध्यक्ष पंजाबराव मस्के यांनी केलेले कार्य व तालुक्याचे शैक्षणिक केंद्रबिंदू ठेरलेल्या महाविद्यालयाविषयी माहिती दिली.
यावेळी वडवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर, वडवणी तहसील कार्यालयाचे शेख रफीक, वडवणी तालुका वकील संघाचे एस. पी. डोंबाळे, प्रा. अशोक खेत्री यांनीही मनोगत व्यक्त केले. शिबिराचे सूत्रसंचालन वडवणी तालुका वकील संघाचे एस. ए. लंगे यांनी केले तर वकील महासंघाचे बी. बी. आंधळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या शिबिरात महाविद्यालयातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.