हे खरं आहे, मित्राने चहा पिण्यासाठी आवाज दिला म्हणून भीषण अपघातात वाचले चालकाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 18:27 IST2025-02-01T18:21:36+5:302025-02-01T18:27:18+5:30
ट्रॉलीचे टायर निखळताच ट्रॅक्टर ऑटोरिक्षावर उलटला; अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला.

हे खरं आहे, मित्राने चहा पिण्यासाठी आवाज दिला म्हणून भीषण अपघातात वाचले चालकाचे प्राण
माजलगाव ( बीड) : उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे मागील टायर अचानक निखळताच पलटी झाल्याने उभी असलेली ऑटोरिक्षा पूर्णपणे चेमटली. काही क्षणापूर्वी चहासाठी मित्राने आवाज दिल्याने रिक्षा चालकाचे प्राण वाचले. येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
छत्रपती संभाजी महाराज चौकातून सावरगाव येथील साखर कारखान्याकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॉलीचे (एमएच २५ एडब्ल्यू ४५३१) उजव्या बाजूचे मागील टायर अचानक निखळून पडले व जवळपास ५-६ फूट ट्रॅक्टर रोडवर घासत गेला. जवळच उभ्या असलेल्या (एमएच २३ १२०६) या रिक्षावर जाऊन ट्रॅक्टर धडकल्याने रिक्षा पूर्णपणे दबली. ही घटना घडण्याच्या एक मिनीट आधी रिक्षाचालक पवन उजगरे (रा. भीमनगर, माजलगाव) याला बाजूला उभ्या असलेल्या मित्राने चहा पिण्यासाठी बोलावले. त्यामुळे रिक्षा उभी करून मित्राकडे जात असताना ही घटना घडली. यावेळी ट्रॅक्टरची ट्रॉली पाच ते सहा फूट घासत पुढे गेली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रॉलीमध्ये असलेला ऊस पूर्णपणे रस्त्यावर पांगला होता. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला.
जीव वाचला, रिक्षाचे मोठे नुकसान
मी ऑटोमध्ये बसून प्रवाशांची वाट पाहत होतो. यावेळी जवळच उभ्या असलेल्या मित्राने चहा पिण्यासाठी आवाज दिल्यामुळे मी रिक्षातून खाली उतरताच उसाने भरलेल्या ट्रॉलीचे टायर निखळल्याने ट्रॅक्टर माझ्या ऑटो रिक्षावर येऊन पलटी झाला. यात माझी रिक्षा पूर्णपणे दबली. यात माझ्या रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
- पवन उजगरे, रिक्षाचालक