मौजमजेसाठी सोळाव्या वर्षीच ते बनले चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:35 IST2018-06-18T00:35:07+5:302018-06-18T00:35:07+5:30

मौजमजेसाठी सोळाव्या वर्षीच ते बनले चोर
बीड : मौजमजस्ती पैशांची चणचण जाणवू लागल्याने अवघ्या १६ व्या वर्षी दोघे अट्टल चोरटे बनल्याचे समोर आले आहे. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातून मोबाईल व इतर किंमती मुद्देमाल लंपास करताना तिघांना दरोडा प्रतिबंधक पथकाने बीडमध्ये रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
गणेश संतोष गिरी (१८, रा. अंथरवण पिंप्री ह. मु. इंद्रप्रस्थ कॉलनी, बीड) असे टोळीतील एकाचे नाव असून, इतर दोघे १६ वर्षाचे आहेत. गणेश हा टोळीचा म्होरक्या आहे. इतर दोन अल्पवयीन मित्रांना सोबत घेऊन तो मौजमस्ती करीत असे. मधल्या काळात त्यांच्या गरजा वाढल्या. पैशांची चणचण जाणवू लागली. त्यामुळे ही गरज भागवायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.
यावर गणेशने अल्पवयीन मित्रांच्या डोक्यात मोबाईल व किंमती मुद्देमाल लंपास करण्याचे खूळ भरले. त्यानंतर हे तिघेही गर्दी व इतर ठिकाणी जाऊन महिलांच्या पर्स, नागरिकांच्या खिशातील पैसे, मोबाईल लंपास करण्याचे गुन्हे करु लागले. यामधून त्यांना थोडाफार पैसा मिळू लागला. यातून ते मौजमस्ती करु लागले. मात्र दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी सापळा लावत माहिती काढली.
यावेळी गणेशसह इतर दोघे सुभाष रोडवर चोरीसाठी येत असल्याचे माहित झाले. त्याप्रमाणे त्यांनी सापळा रचत तिघांनाही सुभाष रोडवर बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पाच मोबाईल व इतर किंमती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाजीनगर व बीड ठाणेहद्दीत घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल त्यांच्याकडून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे दरोडा प्रतिबंधकचे सपोनि गजानन जाधव यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे पो. नि. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव, मुंजाबा सौंदरमल, अशोक दुबाले, हरीभाऊ बांगर व चालक तोटेवाड यांनी केली आहे.