साडेतीन कोटींच्या अपहाराची चौकशी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST2021-03-17T04:34:08+5:302021-03-17T04:34:08+5:30
बीड : केज पंचायत समितीअंतर्गत नरेगाच्या विविध कामांत जवळपास साडेतीन कोटी रुपयांच्या अपहाराबाबत मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेली चौकशी ...

साडेतीन कोटींच्या अपहाराची चौकशी अंतिम टप्प्यात
बीड : केज पंचायत समितीअंतर्गत नरेगाच्या विविध कामांत जवळपास साडेतीन कोटी रुपयांच्या अपहाराबाबत मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेली चौकशी पहिल्या टप्प्यात पूर्ण झाली असून, त्यानंतर बजावलेल्या नोटीसला मिळालेले उत्तर व खुलाश्यांची पडताळणी करून अपहारनिश्चती होणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी पाच अधिकाऱ्यांचे पथक नेमले आहे. यात ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे हे पथक प्रमुख असून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, पाटोदा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बापू राख हे सदस्य तर नरेगा कक्षाचे गटविकास अधिकारी दीपक जोगदंड हे या समितीचे सचिव असतील.
केज पंचायत समितीअंतर्गत नरेगाच्या कामात गैरव्यवहारप्रकरणी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पथकाने गावनिहाय चौकशी करून अहवाल तयार केला. तो प्राप्त झाल्यानंतर सीईओंनी केज पंचायत समिती नरेगा कक्षातील अधिकारी, कर्मचारी व याअंतर्गत असलेल्या ११४ ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, तांत्रिक अधिकारी, ग्राम रोजगार सेवक अशा ४७४ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार संबंधितांनी खुलासे प्रशासनाला सादर केले. या खुलाश्यासोबत दिलेल्या पुराव्यांचे अवलोकन करून सत्यता व खात्री पटविण्यासाठी तसेच अंतिम कार्यवाहीसाठी पाच अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. सर्व बाबींची पडताळणी करून पुढील दहा दिवसात निष्कर्ष अहवाल स्पष्ट अभिप्रायासह सादर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
काय करणार पथक
नियुक्त केलेले हे पथक चौकशी अहवालाचे अवलोकन करणार आहे. नोटीस बजावल्यानंतर प्राप्त झालेले खुलासे व त्यासोबतचे पुरावे, कागदपत्रांचे अवलोकन तसेच सविस्तर पडताळणी करणार आहे. चौकशी अहवाल खुलासे आणि पुरावे यांचा ताळमेळ घेऊन अंतिम निष्कर्षासह पुढील कार्यवाहीबाबत कळविणार आहे. अंतिम निष्कर्षानुसार अपहाराची रक्कम निश्चित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही (खुलासे ,पुरावे ,चौकशी अहवाल) नरेगा कक्षाच्या गट विकास अधिकाऱ्यांनी करावयाची आहे.
संशयाच्या भोवऱ्यात कोण?
दोन गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी, संगणकचालक, लिपिक तसेच सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, शाखा अभियंता, पंचायत समिती कृषी विभागाचे तांत्रिक सहायक असे ११४ जण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे समजते.