अतिवृष्टीने पीकांचे नुकसान, मात्र पंचनाम्यास विमा कंपनीचा नकार; बीडमध्ये शेतकऱ्यांना फटका
By शिरीष शिंदे | Updated: August 26, 2025 16:16 IST2025-08-26T16:15:58+5:302025-08-26T16:16:47+5:30
आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे कंपनीचे पत्र

अतिवृष्टीने पीकांचे नुकसान, मात्र पंचनाम्यास विमा कंपनीचा नकार; बीडमध्ये शेतकऱ्यांना फटका
बीड : राज्य सरकारने चालू खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्याचा मोठा आर्थिक फटका बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. जिल्ह्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यात सहभागी होण्यास विमा कंपनीने स्पष्ट नकार दिला आहे. आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे पत्र आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने तहसील प्रशासनाला दिले आहे.
विमा कंपनीने फिरवली पाठ
काही दिवसांपूर्वी गेवराईच्या तहसीलदारांनी, एनडीआरएफच्या निकषांनुसार होणाऱ्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यात विमा कंपनीने सहभागी व्हावे, यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीला पत्र दिले होते. यावर उत्तर देताना कंपनीने म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे सह-निरीक्षण करण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यापुरती आहे. एनडीआरएफच्या द्वारे आयोजित नुकसान मूल्यांकन सर्वेक्षणात आमचा सहभाग योजनेच्या कक्षेबाहेर आहे.’ कंपनीच्या या भूमिकेमुळे ऐन संकटाच्या काळात शेतकऱ्यांना कोणाचा आधार घ्यावा, असा प्रश्न पडला आहे.
निकष का बदलले?
२०२२ पासून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ १ रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती, त्याचा विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार भरत होते. मात्र, बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विमा भरल्याची प्रकरणे समोर आली होती. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने २०२५ च्या खरीप हंगामापासून योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत. मात्र, या बदलांची व्यापक माहिती शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे निकष बदलल्याने आता शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसान
एकीकडे विमा कंपनीने हात वर केले असताना, दुसरीकडे जिल्ह्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले आहे. १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे सुरू केले असून ते आता अंतिम टप्प्यात आहेत. पंचनाम्यानंतरच नुकसानीची निश्चित आकडेवारी समोर येणार आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे बाधित गावे ४९ असून नुकसानग्रस्त शेतकरी ३,४०७ आहेत. जिल्ह्यातील नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार २,०४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने पुराच्या पाण्यामुळे २ व्यक्तींचा मृत्यू झाला होता.