माजलगावमध्ये प्रक्रियेऐवजी डम्पिंग ग्राउंडवरील कचरा जाळला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:35 IST2025-05-06T16:34:29+5:302025-05-06T16:35:16+5:30
माजलगाव नगरपालिकेने शहरातील कचरा टाकण्यासाठी केसापुरी येथे डम्पिंग ग्राउंड केले आहे.

माजलगावमध्ये प्रक्रियेऐवजी डम्पिंग ग्राउंडवरील कचरा जाळला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव ( बीड) : शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी या ठिकाणी नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे. मात्र, या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्या ऐवजी दर आठ दिवसाला येथील कचरा जाळला जात आहे. दोन दिवसांपूर्वी घनकचऱ्यास लावलेली आग अजूनही सुरूच आहे. यातून निघणाऱ्या घातक धुरामुळे अनेक गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपालिकेला अनेक वेळा सांगून देखील काहीच उपयोग होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी १५ मे पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
माजलगाव नगरपालिकेने शहरातील कचरा टाकण्यासाठी केसापुरी येथे डम्पिंग ग्राउंड केले आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी व स्वच्छतेसाठी महिन्याला पंचवीस लाख रुपये खर्च होतात. येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असताना कचरा आठ दिवसाला जाळला जातो. हा कचरा जाळल्यानंतर २-३ दिवस विझत नाही आणि त्याचा धूर वातावरणात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यामुळे केसापुरी ,सादोळा , भाटवडगाव, केसापुरी कॅम्प, आबुजवाडी आदी गावातील ग्रामस्थांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. अनेक युवक व वृद्ध दम्याच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. याबाबत गावातील नागरिकांनी नगरपालिकेला अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करूनही याचा काहीच फायदा होईना. उलटे त्रस्त ग्रामस्थ नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना भेटले असता असता त्यांनी हुज्जत घालून अरेरावीची भाषा वापरल्याची माहिती आहे. दरम्यान, येथे ओला व सुका कचरा वेगळा न करता एकत्रित जाळला जातो. कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. पितळ उघडे पडेल म्हणून हा कचरा जाळण्यात येत असल्याचा आरोप केसापुरीचे माजी सरपंच विलास साळवे यांनी केला आहे.
ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
आमच्या गावा लगतच माजलगाव नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे. वाहतूक करतानाच रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा पडून दुर्गंधी पसरते. तसेच आठवड्याला कचरा जाळण्यात येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेला अनेक वेळा सांगून देखील हा कचरा या ठिकाणी जाळण्यात येतो. यामुळे आमच्या गावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यापुढे या ठिकाणी कचरा जाळल्यास आम्ही गावकरी १५ मे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.
- विलास साळवे , ग्रामपंचायत सदस्य केसापुरी
माहिती घेऊन सांगतो
डम्पिंग ग्राउंड मधील कचऱ्याला आग लागली याबाबत मला कसल्याच प्रकारची माहिती नाही. याबाबत माहिती घेऊन सांगतो.
-व्हि.आर.मुंडे , कार्यालयीन अधीक्षक न.प. माजलगाव