मोंढ्यातील गर्दी हटविण्यासाठी बाजार समितीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST2021-06-04T04:26:00+5:302021-06-04T04:26:00+5:30
माजलगाव : जुन्या मोंढ्यात खरेदीसाठी व्यापारी, शेतकरी व ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. वाहने कशीही उभी ...

मोंढ्यातील गर्दी हटविण्यासाठी बाजार समितीचा पुढाकार
माजलगाव : जुन्या मोंढ्यात खरेदीसाठी व्यापारी, शेतकरी व ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. वाहने कशीही उभी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने येथून चालणे मुश्कील झाल्याने शुक्रवारपासून बाजार समिती पुढाकार घेणार असल्याने मोंढ्यात गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
मागील १५-२० दिवसांपासून माजलगाव शहर व तालुक्यात लॉकडाऊन कडक करत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. १ जूनपासून अत्यावश्यक सेवांसह खते, बी-बियाणांच्या दुकानांना वेळ ठरवून सूट देण्यात आली आहे. मंगळवार व बुधवारी किराणा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली, तर बुधवारी संध्याकाळी दमदार पाऊस पडल्याने गुरुवारी सकाळी मोंढ्यात किराणा व इतर अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीबरोबरच खते, बी-बियाणांच्या खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. या झालेल्या गर्दीमुळे तसेच वाहने कशीही लावली जात असल्यामुळे मोंढ्यात चालणे अवघड झाले होते. यामुळे बाजार समितीचे सभापती भारत शेजूळ, उपसभापतींचे प्रतिनिधी अच्युतराव लाटे व सचिव हरिभाऊ सवने यांनी पुढाकार घेत विचारविनिमय केला. यापुढे शेतकरी, व्यापारी व नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमार्फत मोंढ्यातील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे पोलिसांवरील ताण कमी होऊन मोंढ्यात येणाऱ्या वाहनांना शिस्त लागणार आहे.
माजलगाव बाजार समितीने मोंढ्यातील गर्दी कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांमार्फत प्रयत्न केल्यास आमचाही ताण कमी होणार आहे. या कर्मचाऱ्यांना जी मदत लागेल ती दिली जाईल.
-धनंजय फराटे, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे
मोंढ्यात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करता यावी तसेच वेळेत जाता यावे यामुळे मोंढ्यातील गर्दी हटविण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांमार्फत शुक्रवारपासून सहकार्य करणार आहोत. या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी सहकार्य करावे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही.
-भारत शेजूळ, सभापती, बाजार समिती, माजलगाव
फोटो : गुरुवारी माजलगावच्या जुना मोंढ्यात झालेली गर्दी.
===Photopath===
030621\img_20210412_123513_14.jpg