वाळूघाटाच्या लूटीकडे दुर्लक्ष, वरून हल्ला झाल्याचा खोटा गुन्हा दाखल; मंडळ अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:36 IST2025-01-07T18:27:06+5:302025-01-07T18:36:51+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : खोटा गुन्हा दाखल करून दिशाभूल केल्याचा ठपका

Inexcusable neglect of Walughat, board officer who filed false case of attack from above suspended | वाळूघाटाच्या लूटीकडे दुर्लक्ष, वरून हल्ला झाल्याचा खोटा गुन्हा दाखल; मंडळ अधिकारी निलंबित

वाळूघाटाच्या लूटीकडे दुर्लक्ष, वरून हल्ला झाल्याचा खोटा गुन्हा दाखल; मंडळ अधिकारी निलंबित

गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळूघाटावर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उत्खनन झाल्याचा ठपका ठेवत जबाबदारी पार पाडण्यास अक्षम्य दिरंगाई केल्याबद्दल तसेच वाळू गस्त पथकावर हल्ला झाल्याचा खोटा गुन्हा दाखल करून दिशाभूल केल्याने रेवकी येथील मंडळ अधिकारी बाळासाहेब हरिदास पकाले यांना निलंबित करून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ६ जानेवारी रोजी दिले.

राक्षसभुवन वाळूघाटाची ५ जानेवारी रोजी पाहणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उत्खनन झाल्याचे दिसून आले. वाळूच्या उत्खननावर लक्ष ठेवणे ही मंडळ अधिकाऱ्याची जबाबदारी असताना ती पार पाडण्यात पकाले यांनी अक्षम्य दिरंगाई केली. त्यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच वाळू गस्त पथकावर हल्ला झाल्याबाबत खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे शासनाची प्रतिमा जनसामान्यात मलीन झाली आहे. मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले यांनी शासकीय कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष, कर्तव्यात सचोटी परायणता ठेवली नाही. मंडळ अधिकारी पकाले यांचे वर्तन हे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम चे नियम ३ नुसार गैरवर्तन ठरते. या गैरवर्तनाचे गांभीर्य विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे ४ मधील तरतुदीनुसार ६ जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

विभागीय चौकशीचा प्रस्ताव
मंडळ अधिकारी पकाले यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ८ अन्वये विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. पकाले यांचे निलंबन कालावधीत मुख्यालय आष्टी तहसील कार्यालय राहील व सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबन कालावधीत पकाले यांना खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा इतर व्यवसाय करता येणार नाही. त्यांनी तसे केल्यास ते गैरवर्तणुकीबद्दल दोषी ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येईल. तसे केल्यास ते निलंबन निर्वाह भत्ता गमविण्यास पात्र ठरतील, असे आदेश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत.

Web Title: Inexcusable neglect of Walughat, board officer who filed false case of attack from above suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.