गर्दीत महिलेने बसमध्ये जागा मिळवली, सीटवर बसताच कळले दीड लाखांचे दागिने चोरीस गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 19:37 IST2024-09-14T19:37:11+5:302024-09-14T19:37:24+5:30
केज बसस्थानकावर घडली घटना...

गर्दीत महिलेने बसमध्ये जागा मिळवली, सीटवर बसताच कळले दीड लाखांचे दागिने चोरीस गेले
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : महालक्ष्मीच्या सणासाठी मुळ गावी धारूरला आलेली एक महिला शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान केज बसस्थानकावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी थांबली होती. एका बसमध्ये गर्दीत चढत असताना महिलेने पिशवीत ठेवलेली छोटी दागिने आणि रोकडची पर्स चोरट्यांनी लंपास केली.
छत्रपती संभाजीनगर येथील मिटमिटा परिसरातील घृष्णेश्वर सोसायटीत राहणाऱ्या मयुरी स्वरुप कंकाळ या महालक्ष्मीच्या सणासाठी मुळगावी धारूरला आल्या होत्या. सण संपल्यानंतर शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी त्या केज बसस्थानकावर आल्या. सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान एक बस आली. यावेळी प्रवाशांच्या गर्दीत कंकाळ बसमध्ये शिरल्या. मात्र याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांची पिशवी उघडून आत ठेलेली छोटी पर्स लंपास केली. दरम्यान, बसमध्ये जागा मिळताच सीटवर बसलेल्या कंकाळ यांना पिशवी उघडी दिसली. तपासणी केली असता त्यातील छोटी पर्स गायब होतू. या पर्समध्ये ५ तोळे सोन्याचे गंठण, २ सोन्याच्या अंगठ्या आणि रोख १ हजार ७०० रुपये असा एकूण १ लाख ४१ हजार ७०० रुपयांचा ऐवज होता.
याप्रकरणी मयुरी स्वरुप कंकाळ यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे पुढील तपास करीत आहेत.