मतदान केंद्रावर दगडफेक, पोलिसांचा गणवेश फाडला; माजी जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 16:34 IST2022-12-19T16:33:22+5:302022-12-19T16:34:07+5:30
याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांची पत्नी आणि २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मतदान केंद्रावर दगडफेक, पोलिसांचा गणवेश फाडला; माजी जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा
गेवराई (बीड): तालुक्यातील रामुनाईक तांड्यावर रविवारी ( दि. १८ ) सायंकाळी मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. येथील मतदान केंद्रावर जमावाच्या दगडफेकीत चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच पोलीस निरीक्षकासोबत हुज्जत घालत त्यांचा गणवेश फाडण्यात आला. याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पांडुरंग थावरा चव्हाण, त्यांची पत्नी आणि इतर २५ ते ३० जणांविरुद्ध गेवराई पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील केकतपागंरी जवळील रामुनाईक तांड्या येथे रविवारी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व बंजारा समाजाचे नेते प्रा. पांडुरंग थावरा चव्हाण हे येथील मतदान केंद्रांवर वारंवार गर्दी जमवत होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षकांनी याबाबत विचारणा करताच चव्हाण यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली, अंगावरील शासकीय गणवेश फाडला. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात सहायक फौजदार शंकर गलधर, पोलीस अंमलदार कृष्णा जायभाय, सुधीर वाघ, प्रविण कुडके हे जखमी झाले.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांच्या फिर्यादीवरून रविवारी मध्यरात्री माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग थावरा चव्हाण, त्यांची पत्नी रंजना चव्हाण यांच्यासह २५ ते ३० जणांविरूध्द विनाकारण गर्दी जमवणे, वारंवार मतदान केंद्रावर येऊन आचारसंहितेचा भंग, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली, पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी फरार असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर हे करत आहेत.