बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टरच्या अटकेनंतर नर्सही रडारवर,पोलीस पथक रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 15:36 IST2022-06-07T15:34:59+5:302022-06-07T15:36:14+5:30
Illegal abortion case in Beed: नातेवाइकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील चौकशीत कबुली दिल्यानंतर महिला डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे

बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टरच्या अटकेनंतर नर्सही रडारवर,पोलीस पथक रवाना
- सोमनाथ खताळ
बीड : अवैध गर्भपात प्रकरणात आगाेदर मयत महिलेच्या पतीसह नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावले. नंतर त्यांनी कबुली देताच त्यांना ताब्यातही घेतले. आता गेवराई येथील एका महिला डॉक्टरला पोलिसांनी मंगळवारी दुपारी अडीच वाजता ताब्यात घेतले आहे. त्यापाठोपाठ गर्भपात प्रकरणात आता डॉक्टरला सहकार्य करणाऱ्या नर्सही रडारवर आहे. तिला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक एका स्थळी दाखल होत आहे. सायंकाळपर्यंत तिलाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात आणखी आरोपींची साखळी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सीताबाई उर्फ शीतल गणेश गाडे (वय ३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. शीतल या ऊसतोड मजूर असून, त्यांना अगोदरच ९, ६, आणि ३ वर्षांच्या तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. परंतु, रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले होते.
यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी सकाळीच मयताच्या नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. त्यांनी याची कबुली दिली. त्यानंतर त्या सर्वांना घेऊन पोलिस ज्यांनी गर्भपात केला, अशा ठिकाणी पोहचले. गेवराई तालुक्यातील एका महिला डॉक्टरला पोलिसांनी दुपारी २.३० वाजता ताब्यात घेतले आहे. या कारवाईने खळबळ उडाली होती. आता डॉक्टरला सहकार्य करणारी नर्सही ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.