परीक्षेनंतर निर्णय झाला असता तर मुलांनी किमान अभ्यास केला असता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST2021-02-05T08:28:40+5:302021-02-05T08:28:40+5:30
बीड : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) नव्या नियमानुसार यंदा दहावीचा एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याचे सूचित केले ...

परीक्षेनंतर निर्णय झाला असता तर मुलांनी किमान अभ्यास केला असता
बीड : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) नव्या नियमानुसार यंदा दहावीचा एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याचे सूचित केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नसून पालकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागत होत असलेतरी परीक्षेनंतर हा निर्णय घेतला असला तर विद्यार्थी किमान अभ्यास तरी केला असता, अशा संमिश्र प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या.
कोरोनामुळे शाळांमधून ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. परिपूर्ण सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी तयारी केली तर कुठे अभावामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ किती झाला, यापेक्षा विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्किल इंडिया इनिशिएटिव्ह समोर ठेवून हा निर्णय घेतला असलातरी मुलांच्या बुद्धिमत्तेचा निकष काय लावणार? असा सवाल पालक करत आहेत.
असा आहे नियम
सीबीएसई दहावीचा विद्यार्थी गणित किंवा विज्ञान विषयात नापास झाला आणि त्याने ऐच्छिक विषय घेतलेल्या कौशल्य आधारित विषयात तो उत्तीर्ण झाला तर त्याला उत्तीर्ण समजले जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन टेक्नाॅलॉजी, कॉम्प्युटर सायन्स आदी ऐच्छिक विषय आहेत. यानंतर दहावीची टक्केवारी बेस्ट ऑफ फाईव्ह सब्जेक्टसच्या आधारावर ठरवली जाईल. या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
------
बोर्डाने योग्य निर्णय घेतला आहे. आयुष्यातील पहिल्या शैक्षणिक वळणावर जाताना विद्यार्थी निराश होणार नाहीत. वर्ष वाया जाणार नाही. न्यूनगंड संपून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. - भारत गिरी, पालक, बीड.
--------
या निर्णयामुळे अभ्यास करण्याची गती मंदावेल, अभ्यास करणार नाहीत. अभ्यासाची ऊर्मी असणारी मुले खचून जातात. परीक्षा झाल्यानंतर ही घोषणा केली असती विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असता आणि आनंदही झाला असता. - अनंत देशमुख, पालक, बीड.
----
हा निर्णय योग्य वाटत नाही. विद्यार्थ्यांची क्षमता, त्यांचा अभ्यास, पालकांच्या स्वप्नावर पाणी फेरले जाणार आहे. निकष कोणते लावले जाणार? बौद्धिक कुवत कशी विकसित होणार? - महादेव अलझेंडे, पालक, माजलगाव.