भविष्यातील धोके ओळखून झाडे लावा : सयाजी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 16:59 IST2020-02-14T16:58:15+5:302020-02-14T16:59:05+5:30
पहिल्या वृक्ष संमेलनाचे बीडमध्ये उद्घाटन

भविष्यातील धोके ओळखून झाडे लावा : सयाजी शिंदे
- अनिल भंडारी
बीड : मानवी आयुष्य वृक्ष केंद्रित आहे. झाडे असतील तर पाऊस पडेल, पर्यावरणाचे रक्षण होईल. ‘एक देश मागे गेला तर शेतकरी मागे गेला, एक देश पुढे गेला तर शेतकरी पुढे गेला’. त्यामुळे भविष्यातील संकट टाळण्यासाठी वृक्ष लागवड करून संवर्धन आणि जतन करण्याचे आवाहन पहिल्या वृक्ष संमेलनात सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी केले.
सिनेअभिनेता सयाजी शिंदे व सिनेलेखक अरविंद जगताप यांच्या संकल्पनेतून पहिल्या वृक्ष संमेलनाचे उद्घाटन गुरूवारी सकाळी उत्साहात पार पडले. लिंबाच्या नावाने चांगभलं, पिंपळाच्या नावाने चांगभलं.. असा जयघोष करीत शेकडो विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. बीडपासून जवळच पालवण शिवारात सह्याद्री देवराई आणि वनविभागाच्या वतीने या संमेलनाचे आयोजन केले आहे.
व्यासपीठावर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, आ. संदीप क्षीरसागर, महसूल उपायुक्त शिवानंद टाकसाळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, संयोजक शिवराम घोडके, माजी. आ. उषा दराडे, विभागीय वनाधिकारी मधुकर तेलंग, वनाधिकारी अमोल मुंडे, कृषीभूषण शिवराम घोडके, संतोष सोहनी, प्राचार्या डॉ. सविता शेटे, वनाधिकारी सायमा पठाण, वनपाल मोरे, वनरक्षक सोनाली वनवे, मंगेश लोळगेसह विविध ठिकाणाहून आलेले पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. यावेळी सयाजी शिंदे यांनी वृक्ष संमेलनाची भूमिका मांडली. संयोजक शिवराम घोडके यांनी पालवण देवराई परिसरात लावलेल्या झाडांचे तीन वाढदिवस साजरे केल्यानंतर जगातले पहिले वृक्ष संमेलन येथे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
खरी श्रीमंती झाडांचीच
वृक्ष संमेलन आयोजनाचे धाडस केले. यश- अपयशात मोजदाद करता येणार नाही. झाडे किती लावतो, त्याचे वाढदिवस किती करतो हे महत्वाचे आहे. वृक्ष हीच खरी संपत्ती आहे. वृक्ष लागवडीतून उजाड महाराष्टÑाला श्रीमंत करण्यासाठी ही चळवळ आहे. या संमेलनाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आय एम हॅपी. कोणी लहान किंवा मोठे नाही. आॅक्सिजन महत्वाचे आहे. बीडकरांनी जागरूक व्हावे, प्रत्येकाने किमान पाच झाडे लावण्याची प्रेरणा घ्यावी. निसर्ग संपदेच्या ºहासामुळे होणारे धोके ओळखा, आपलं गाव, शहर , राज्य आणि देश हिरवेगार करण्यासाठी झाडे लावा आणि ते जगवा, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले.
शेकडो पर्यावरणप्रेमींची मांदियाळी
बुधवारी वृक्षदिंडीने बीड येथील वृक्ष संमेलनाला प्रारंभ झाला. गुरुवारी पालवण परिसरात पर्यावरणप्रेमींचा मेळा जमला. सातारा, चिपळूण, पुणे, लातूर, उस्मानाबाद आदी महाराष्टÑाच्या विविध भागातून दीड हजारांहून जास्त पर्यावरणप्रेमी सायकल आणि इतर वाहनाने आले होते. तसेच राज्यात २४ ठिकाणी असलेल्या देवराई सह्याद्री परिवाराचे तीनशेहून जास्त पर्यावरणस्नेही सहभागी झाले होते. वृक्ष सुंदरी स्पर्धेत १०० पेक्षा जास्त महाविद्यालयीन तरूणींचा सहभाग होता.