आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत न्याय मिळाला असे वाटणार नाही; ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:31 IST2025-02-18T16:30:22+5:302025-02-18T16:31:04+5:30
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर परळीत खासदार सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचे आज दुपारी भेट घेऊन सांत्वन केले

आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत न्याय मिळाला असे वाटणार नाही; ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणावर ठाम
परळी ( बीड) : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दुपारी ( दि. १८ ) परळी येथे महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलिस अधिक्षकांना फोन करून जलद तपास करत मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी केली. तसेच या लढ्यात आम्ही सोबत असल्याचे मुंडे कुटुंबीयांना खा. सुळे यांनी सांगितले. यानंतर देखील दिवंगत मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आपण उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. त्यांनी पोलिसांना येत्या मंगळवारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर परळीत खासदार सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचे आज दुपारी भेट घेऊन सांत्वन केले आहे. खा. सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांची मुले आणि महादेव मुंडे यांच्या वडीलांस अश्रू अनावर झाले. महादेव मुंडे यांच्या खुनास पंधरा महिने उलटून गेले आहे तरी अद्याप या प्रकरणाचा तपास लागला नाही. एकाही आरोपींना अटक करण्यात आली नाही. आरोपींना अटक का होत नाही? असा प्रश्नही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खासदार सुप्रीया सुळे यांच्यासमोर यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संवाद साधला. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी, स्वतः लक्ष घालून पारदर्शी पद्धतीने तपास करण्यात येईल व ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या संपर्कात राहून तपासाबाबत प्रगती कळविण्यात येईल असे, आश्वासन खासदार सुळे यांना दिले. खासदार सुळे यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे,आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. महादेव मुंडे यांचा खून प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्यातील पोलीस करू शकत नाही. अशी खंत यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्ती.
उपोषणावर ठाम
आपल्या पतीच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळाला असे वाटणार नाही. पोलिसांनी आजपर्यंत तपास केला नाही. पोलीस प्रशासन दोषी आहे. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आपण मंगळवारी उपोषणाचा मार्ग अवलंबिनार असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी सांगितले. अंबाजोगाईत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले हे पंधरा महिन्यापूर्वी पासून असून त्यांच्या उपस्थितीत महादेव मुंडे यांच्या खुनाच्या घटनेचा पंचनामा झालेला आहे. आता त्यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळातील काही पोलीस अधिकाऱ्यांना प्रमोशनही मिळाले आहे . तर काहींच्या पोलिसांच्या बदल्या झाल्या, असेही यावेळी सांगण्यात आले.