महादेव मुंडेंचे खूनी सापडत का नाहीत? परळीत ठाण मांडलेल्या पोलिसांच्या बदल्या करा: सुरेश धस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 15:57 IST2025-02-22T15:56:46+5:302025-02-22T15:57:46+5:30

महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली व चर्चा केली.

How come Mahadev Munde's killers are not found? MLA Suresh Dhas demands transfer of police stationed in Parli | महादेव मुंडेंचे खूनी सापडत का नाहीत? परळीत ठाण मांडलेल्या पोलिसांच्या बदल्या करा: सुरेश धस

महादेव मुंडेंचे खूनी सापडत का नाहीत? परळीत ठाण मांडलेल्या पोलिसांच्या बदल्या करा: सुरेश धस

परळी : येथील महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी 15 महिने होऊनही कसे काय सापडत नाहीत ?पोलीस काय करतात ?  असा प्रश्न उपस्थित करून परळीतील पोलीस दलात  गेल्या दहा-बारा वर्षांपासून येथेच असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या व्हायला हव्यात  व नवीन पोलिसांची नियुक्ती करायला हवी अशी मागणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी परळी येथे माध्यमांशी बोलताना केली आहे. येथील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली व चर्चा केली.

मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीच्या खुनाबद्दल माहिती दिली व न्याय मिळण्याच्या मागणीसाठी आपण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात मंगळवारी उपोषण करणार असल्याचे सांगितले. आपल्या पतीचा काही दोष नसताना खून कसा झाला ? आरोपींना का अटक केली जात नाही? असे सवाल करत मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आपले समाधान होणार नाही, असे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. 

महादेव मुंडे यांचे मुळगाव परळी तालुक्यातील भोपळा आहे तर कन्हेरवाडी ही सासरवाडी आहे. परळीत काही वर्ष महादेव मुंडे यांनी एका दुकानावर काम केले. त्यानंतर दुधाचा व्यवसाय केला. पिग्मी कलेक्शन केले व प्लॉटिंगची खरेदीविक्रीचा व्यवसाय केला. 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी परळी शहर  ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .परंतु अद्याप या प्रकरणात एकही आरोपी निष्पन्न झाला नाही व आरोपीस अटक करण्यात आले नाही. परळी शहर पोलिसांना या प्रकरणात आरोपी निष्पन्न करता आले नाही त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी 15 महिन्यानंतर हे अटक का होत नाहीत असा प्रश्न उपस्थित करून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहर पोलिसांचा तपास काढून अंबाजोगाई चे उपविभागीय  पोलिस अधिकारी अधिकारी अनिल चोरमले यांच्याकडे देण्यात आला त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले आहे. 

आरोपी लवकर सापडतील अशी आशा 
विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे व चार हवालदार या प्रकरणाचा आता तपास करत आहे .पोलीस निरीक्षक साबळे हे चांगले आहेत .निश्चितच या प्रकरणातील आरोपी सापडतील अशी आशा  आमदार सुरेश धस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली यावेळी त्यांच्यासोबत राजेसाहेब देशमुख,सतीश फड उपस्थित होते.

Web Title: How come Mahadev Munde's killers are not found? MLA Suresh Dhas demands transfer of police stationed in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.