Hotel manager suicides by beating | मारहाण केल्याने हॉटेल मॅनेजरची आत्महत्या
मारहाण केल्याने हॉटेल मॅनेजरची आत्महत्या

ठळक मुद्देआर्थिक व्यवहार करू नयेत, असे दिले होते जाहीर प्रगटन : अपमान सहन न झाल्याने घेतला गळफास

बीड : शहरातील एका हॉटेलवर व्यवस्थापकास हॉटेल मालकाने मारहाण केली होती. तसेच त्याच्यासोबत आर्थिक व्यावहार करु नयेत, असे जाहीर प्रकटन एका स्थानिक वृत्तपत्रातद्वारे प्रकाशित केले होते. या कारणामुळे त्या व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
भरत संपत सुपेकर (वय ३५, रा. नायगाव ता. पाटोदा हमु संत नामदेवनगर धनोरा रोड बीड) असे मयताचे नाव आहे. भरत हे गावी शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, पावसाअभावी शेती पिकत नसल्याने ते कामानिमित्त बीडमध्ये संत नामदेवनगरातील असलेल्या आपल्या सासरवाडीकडील मंडळींसोबत राहत होते. नवनाथ शिराळे यांच्या बार्शी रोडवरील हॉटेलात ते व्यवस्थापक म्हणून काम करत होते.
अश्विनी सुपेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने शेतात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीकामासाठी भरत सुपेकर पत्नी अश्विनी समवेत गावी गेले होते. दरम्यान १२ नोव्हेंबर रोजी सुपेकर हे परत बीडला आले होते. रोजच्याप्रमाणे कामासाठी हॉटेलवर गेले.
यावेळी हॉटेल मालक नवनाथ शिराळे याने ‘तू सुटी घेतल्याने आमचे आर्थिक नुकसान झाले’ असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर ते घरी परतले. त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्यांनी त्यांच्या पत्नीस सांगितला. शिराळे यांने ‘भरत सुपेकर यांच्याशी व्यवहार करु नका’ असे जाहीर प्रगटन एका स्थानिक वर्तमानपत्रात दिले होते. ते पाहून बुधवारी सकाळी भरत सुपेकर हे तणावात होते. याच नैराश्यातून त्यांनी बुधवारी दुपारी पत्नी मुलांना आणण्यासाठी शाळेत गेली तेव्हा भरत सुपेकर यांनी घरातील पत्र्याखालील आडूला नायलॉनची दोरी बांधून आत्महत्या केली.
याप्रकरणी त्यांची पत्नी अश्विनी यांच्या फिर्यादीवरून नवनाथ शिराळे व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह घेतला नव्हता ताब्यात
भरत संपत सुपेकर यांनी आत्हमत्या केल्यानंतर ‘जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही’ असा पवित्रा नातेवाईंकांनी घेतला होता.
अखेर पत्नी अश्विनी यांच्या फिर्यादीवरुन सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भरत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

Web Title: Hotel manager suicides by beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.