ऐतिहासिक निकाल! शिक्षक साजेद अली हत्या प्रकरण; गुजर खान गँगमधील १२ आरोपींना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 19:34 IST2024-12-14T19:34:02+5:302024-12-14T19:34:50+5:30

या खटल्यात तिघे निर्दोष सुटले असून गँगमधील १८ पैकी १२ जणांना जन्मठेप तर आणखी दोघांना कारवासासह दंडाची शिक्षा

Historic verdict! Teacher Sajeed Ali murder case; 12 accused of Gujar Khan gang sentenced to life imprisonment | ऐतिहासिक निकाल! शिक्षक साजेद अली हत्या प्रकरण; गुजर खान गँगमधील १२ आरोपींना जन्मठेप

ऐतिहासिक निकाल! शिक्षक साजेद अली हत्या प्रकरण; गुजर खान गँगमधील १२ आरोपींना जन्मठेप

बीड : शहरातील सय्यद साजेद अली मिर अन्सार अली (वय ३८, रा. बालेपीर, बीड) या शिक्षकाचा भरदुपारी खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी लागला. यात गुजर खानसह त्याच्या गँगमधील १८ पैकी १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दोघांना कारावास आणि दंड ठोठावला आहे, तर तिघांना निर्दोष मुक्त केले आहे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ बीड तथा विशेष मोक्का न्या. एस. आर. पाटील यांनी हा निकाल दिला आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने, त्यदृष्टीने हा ऐतिहासिक निकाल समजला जात आहे.

सय्यद साजेद अली या शिक्षकाकडे गुजर खान गँगने खंडणी मागितली होती. ती न दिल्याने २०१३ साली साजेद यांच्यावर हल्ला करून त्यांचे पाय तोडण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात दाखल झालेली केस मागे घेत नसल्याच्या कारणातून १९ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी २:३० ते ३ वाजेच्या सुमारास साजेद अली यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर ही गँग फरार झाली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुजरसह १८ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी यातील १७ आरोपींना अटक केली. त्यांच्यावर मोक्काही लावण्यात आला होता. या प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये कलम ३०२, १२०(ब), १४३, १४७, १४९, १९५ (अ), २०१, २१२, ३८५ भा.दं.वि. सहकलम ३(१)(i), ३(२), ३(४), ३(५) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधि. १९९९ सह कलम ३/२५, ४/२७ शस्त्र अधिनियम, सह कलम १३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम सह कलम ७ क्रिमिनल लॉ अमेंडमेन्ट ॲक्टप्रमाणे १४ जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. अजय श्री. तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय दि. राख यांनी मार्गदर्शन व सर्व सहा. सरकारी वकील यांचे सहकार्य लाभले. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक बी. बी. जायभाये, बी. बी. शिंदे, एस. बी. तरटे, जी. एम. परजणे, एन. डी. भोसले, एस. पी. वाघमारे यांनी काम पाहिले.

कोणाला काय शिक्षा?
अन्वरखान ऊर्फ गुजरखान पिता मिर्झाखान (रा. बालेपीर, बीड), मुजीबखान मिर्झाखान पठाण, आवेज काझी, शेख इमरान ऊर्फ काला इमरान शेख रशीद, सय्यद नासेर सय्यद नूर, सय्यद शाहरुख सय्यद नूर, शेख उबेद शेख बाबू, शेख सर्फराज ऊर्फ सरूडॉन, शेख शहबाज शेख कलीम, शेख अमर शेख अकबर (रा. गुलशननगर, बीड), शेख बबर शेख युसूफ (रा. खासबाग, बीड), शेख मजहर ऊर्फ हाफमर्डर शेख रहीम (रा. बांगरनाला, भारतभूषणनगर, बीड), बबरखान गुलमहंमदखान पठाण (रा. नेकनूर, ता. जि. बीड), शेख वसीम शेख बुऱ्हानोद्दीन (रा. रोशनपुरा, बीड) यांना दोषी ठरविण्यात आले आहे. तर तिघांना निर्दोष साेडले आहे. इम्रान पठाण ऊर्फ चड्डा हा अद्यापही फरार आहे. यातच बबरखान पठाण याला पाच वर्षे कारवास आणि पाच लाख रुपये दंड तसेच शेख वसीम याला सहा महिने शिक्षा आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. १२ आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय १२ पैकी सात जणांना कारावासासह प्रत्येकी पाच लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

यात ४४ साक्षीदार तपासले 
आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा निकाल आहे. एकाचवेळी १४ आरोपी दोषी आणि त्यातही १२ जणांना जन्मठेप होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खुनासह मोक्का व इतर कलमान्वये ही शिक्षा सुनावली आहे. यात ४४ साक्षीदार तपासले होते.
- ॲड. अजय तांदळे, सहायक सरकारी वकील, बीड

Web Title: Historic verdict! Teacher Sajeed Ali murder case; 12 accused of Gujar Khan gang sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.