height of negligence; The patient was suffers due to indiscipline at Beed District Hospital | वेळीच पट्टी न केल्याने रुग्णाच्या जखमेत झाल्या आळ्या; बीड जिल्हा रुग्णालयात हलगर्जीपणाचा कळस
वेळीच पट्टी न केल्याने रुग्णाच्या जखमेत झाल्या आळ्या; बीड जिल्हा रुग्णालयात हलगर्जीपणाचा कळस

ठळक मुद्दे बीड जिल्हा रूग्णालयातील संतापजनक प्रकार दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी

बीड : झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर तब्बल तीन दिवस होऊनही पट्टी न बदलल्याने त्या जखमेवर आळ्या पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी मंगळवारी याचा अहवाल मागविला आहे.

ज्ञानदेव निवृत्ती वीर (५५ रा.पाली जि.बीड) हे शेळीला पाला काढण्यासाठी झाडावर चढले होते. याचवेळी त्यांचा तोल गेल्याने खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. ही घटना शुक्रवारी घडली होती. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी डोक्याला जखमेच्या ठिकाणी सात टाके घेऊन वॉर्ड क्रमांक पाच मध्ये शरीक केले. या जखमेची पट्टी एक दिवसाआड बदलणे गरजेचे होते. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांची हलगर्जी आणि डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे तीन दिवसानंतरही ही पट्टी बदलण्यात आली नाही. अखेर नातेवाईकांनी आक्रमक होत उपचाराची मागणी करताच डॉक्टरांनी पट्टी बदलली. यावेळी जखमेमध्ये काही आळ्या दिसून आल्या. या घटनेने आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, एकीकडे सरकारी रूग्णालयांमध्ये पहिल्यापेक्षा चांगल्या सुविधा मिळू लागल्याने सामान्यांचा ओढा वाढला आहे. मात्र, काही कामचुकार डॉक्टरांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे. आता या प्रकरणातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. यातील दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

प्रकार कानावर आला आहे. याचा अहवाल मागविला आहे. चौकशी करून दोषी कर्मचारी, डॉक्टरांवर कारवाई केली जाईल. 
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

Web Title: height of negligence; The patient was suffers due to indiscipline at Beed District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.