बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 03:48 IST2025-08-18T03:47:55+5:302025-08-18T03:48:36+5:30
मुसळधार पाऊस, जोरदार प्रवाह आणि अंधार यामुळे बचाव कार्यात मोठी अडचण

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
बीड: जिल्ह्यात रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत साबला कवडगाव परिसरात मध्यरात्री दोन वाजता एक जीप पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरु करत लोक अडकलेल्या झाडापर्यंत दोरीच्या साहाय्याने पोहचण्यात यश मिळवले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जीपमध्ये एकूण सहा लोक प्रवास करत होते. त्यापैकी तिघांनी योग्य वेळी जीपमधून उडी घेतली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका शेवरीच्या झाडावर चढून आपला जीव वाचवला. झाडावरून मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर परिसरातील लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वतः पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. पहाटे तीन वाजेपर्यंत प्रयत्न सुरू राहिले. मात्र मुसळधार पाऊस, जोरदार प्रवाह आणि अंधार यामुळे बचाव कार्यात मोठी अडचण निर्माण झाली. उर्वरित लोकांचा शोध घेण्यासाठी पोलिस व स्थानिकांनी मिळून शर्थीचे प्रयत्न केले.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक सतत नदी-नाल्यांच्या पाण्याच्या वाढत्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत. ग्रामीण भागात काही घरांना पाणी शिरल्याचे वृत्त आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
आपत्ती व्यवस्थापन नाहीच!
पूरस्थिती निर्माण होऊनही आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी कुठेही दिसून आले नाही. पोलिसांवरच बचावकार्याची जबाबदारी पडली, स्थानिक प्रशासन पूर्णतः निष्क्रिय असल्याची भावना. वेळेत मदत मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "पूर आला तरी सरकारी आपत्ती विभाग केवळ कागदावरच" अशी बोचरी टीका ग्रामस्थ करत आहेत.