उकाड्याने हैराण दाम्पत्य छ्तावर झोपले; खाली चोरट्यांनी घर साफ केले, ७ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 16:43 IST2022-06-01T16:43:06+5:302022-06-01T16:43:33+5:30
चोरट्यांच्या काही वस्तू घटनास्थळावर विसरल्या होत्या त्या परत मिळवण्यासाठी चोरटे परत आले होते.

उकाड्याने हैराण दाम्पत्य छ्तावर झोपले; खाली चोरट्यांनी घर साफ केले, ७ लाखांचा ऐवज लंपास
दिंद्रुड (बीड) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत मंगळवारी मध्यरात्री जबरी चोरीचे घटना घडली. सोने-चांदी व नगदी रोकड असा साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला .
सविस्तर वृत्त असे की, माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड नजदीक असलेले पिंपळगाव (ना.)या गावातील माणिकराव मायकर व पुष्पा माणिकराव मायकर यांच्या घरी केवळ वयोवृद्ध पती-पत्नी राहतात. उकाड्याचे दिवस असल्याने हे दांपत्य छतावर झोपण्यास गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी स्वयंपाक घरातून आत प्रवेश केला. घरातील कपाट तोडून तिजोरीत असलेले तीन लाख व अन्यत्र ठेवलेले दीड लाख असे साडेचार लाखांची रोकड, कपाटातील जवळपास एक किलो चांदीचे दागिने व पाच तोळ्याचा सोन्याचा ऐवज असा, जवळपास साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मायकर दांपत्याने दिली. दरम्यान, चोरटे घरातून पळत असताना काही गावकऱ्यांनी बघितले. तीन चोर मोटरसायकलवर फरार झाल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ठस्से व श्वान पथक बुधवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले होते.
अन् चोरटे आले परत
मंगळवारी मध्यरात्री चोरी केल्यानंतर चोरट्यांच्या काही वस्तू घटनास्थळावर विसरल्या होत्या त्या परत मिळवण्यासाठी चोरटे परत फिरले मात्र योगायोगाने पाऊस पडण्यास सुरुवात झाली व मायकर दांपत्य छतावरून खाली आले. चोरी झाल्याची त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केला, त्यामुळे चोरट्यांना वस्तू न घेता पलायन करावे लागले. याच वेळी काही ग्रामस्थांनी त्यांना बघून दगडफेक सुरू केली.चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले असल्याची माहिती पिंपळगाव ग्रामस्थांनी दिली.