परीक्षा तोंडावर असताना लिहिण्याची सवय मोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST2021-03-27T04:35:22+5:302021-03-27T04:35:22+5:30
अंबाजोगाई : गेल्या वर्षभरापासून शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे हस्तलेखनाचा सराव मोठ्या ...

परीक्षा तोंडावर असताना लिहिण्याची सवय मोडली
अंबाजोगाई : गेल्या वर्षभरापासून शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे हस्तलेखनाचा सराव मोठ्या प्रमाणात कमी झाला. आता महिनाभरातच दहावी व बारावीची परीक्षा सुरू होईल. अशावेळी लिखाणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव न राहिल्यास परीक्षा देतांना त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल की काय? अशी चिंता पालकांना भेडसावू लागली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईन सुरू झाले. गेल्या वर्षभरापासून सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविला जातो. बहुतांश विद्यार्थी कोरोनाच्या भीतीमुळे घरात बसूनच ऑनलाईन अभ्यास करू लागले होते. अजूनही विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईनच सुरू आहे. आता सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी सातत्याने मोबाईल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामुळे त्यांचा हस्तलेखनाचा सराव अचानक बंद झाला. सर्व काही ऑनलाईनच झाले. दैनंदिन जीवनात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात होणाऱ्या दैनंदिन तासिका. तासिका व्यतिरिक्त लावण्यात आलेल्या शिकवण्या यामध्येही पुन्हा तेच मिळणारे शिक्षण याचा सराव मोठ्या पद्धतीने लिखाणातूनच होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना हस्तलेखनाचा सराव दैनंदिन असतो. मात्र, आता या हस्तलेखनापासून विद्यार्थी दूर राहिले आहेत. आता परीक्षा जवळ आल्याने व लिखाणाचा सराव घटल्याने त्यांना लिखाणाचा मोठा सराव करावा लागणार आहे. अन्यथा लिहितांना वेळ अपुरा पडणे या गंभीर समस्येला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबतीत विद्यार्थ्यांनी वेळीच दक्षता बाळगून लिखानाचा सराव करावा म्हणजे त्यांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असा सल्ला प्रा. चंद्रकांत मुळे यांनी दिला आहे. आपल्या पाल्याला लिखाणाबाबत अशा अडचणी निर्माम होतील की काय? अशी भीती पालकांना भेडसावू लागली आहे.