गुटखा पुडी खाऊ घातली नाही म्हणून एकास चाकूने भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 18:44 IST2020-06-16T18:43:53+5:302020-06-16T18:44:59+5:30

दोघा सख्ख्या भावांनी घरी बोलावून केला प्राणघातक हल्ला

Gutkha pouch not given; one was stabbed in Ambajogai | गुटखा पुडी खाऊ घातली नाही म्हणून एकास चाकूने भोसकले

गुटखा पुडी खाऊ घातली नाही म्हणून एकास चाकूने भोसकले

अंबाजोगाई : गुटखा पुडी खाऊ न घातल्याच्या किरकोळ कारणावरून दोघा सख्ख्या भावांनी प्राणघातक हल्ला करत एकाला चाकूने भोसकले. ही धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणा येथे घडली. धम्मानंद शंकर होके (वय ४८, रा. भावठाणा) असे जखमीचे नाव आहे.   

गावातीलच वशिष्ठ कुंडलिक खरात आणि रमेश कुंडलिक खरात या दोघा भावांनी धम्मानंद यांच्याकडे गुटखा पुडी खाऊ घालण्यासाठी आग्रह धरला होता. धम्मानंद यांनी त्यास नकार दिला. याचा राग आल्याने खरात बंधूंनी सोमवारी सायंकाळी ५.३० वा. स्वत:च्या घरी धम्मानंद यांच्या डोळ्यात चटणीचे पाणी टाकले. त्यानंतर मटन कापायचा चाकूने जीवे मारण्याच्या उद्देशाने धम्मानंद यांना भोसकले आणि त्यास गंभीर जखमी केले असे धम्मानंदची पत्नी मीना यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

सदर फिर्यादीवरून वशिष्ठ आणि रमेश खरात या दोघांवर कलम ३०७, ५०६, ३४ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक सावंत करत आहेत. दरम्यान, जखमी धम्मानंद यांच्यावर स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Gutkha pouch not given; one was stabbed in Ambajogai