NCP Dhananjay Munde: मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीयांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्रिपद सोडल्यापासून धनंजय मुंडे राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय नसल्याचं पाहायला मिळालं. मागील काही दिवसांपासून ते परळीतील आपल्या घरी वास्तव्यास गेले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा ते राजकीय कार्यक्रमांत पाहायला मिळणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार उद्या जिल्ह्यात येणार आहेत. अजित पवार यांच्या या दौऱ्यावेळी पक्षाचे नेते असलेले धनंजय मुंडे हेदेखील त्यांच्यासोबत असतील, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सांगितलं आहे. "गुढीपाडव्यानिमित्त परळीतील विविध दुकाने आणि रुग्णालयांच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे हे हजर राहिले होते. त्यामुळे ते उद्या होणाऱ्या अजित पवारांच्या दौऱ्यावेळीही विविध कार्यक्रमांत उपस्थित असतील," असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
"धनंजय मुंडे हे पुन्हा सक्रिय होऊन पक्षवाढीसाठी काम करतील," असा विश्वासही सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, एकीकडे राजकीय सक्रियतेचे संकेत मिळत असताना दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्याविरोधातील आरोपांची मालिका थांबत नसल्याचं चित्र आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्यावर नवे आरोप केले आहेत. "माझ्यावर हरणाचं मांस खाल्ल्याचा आरोप करून नंतर त्यांनी बाहेरच्या राज्यातून विमानाची तिकिटं काढून बिश्नोई समाजाची काही लोकं आणली. याने हरणाचं मांस खाल्लंय असं सांगून बिश्नोई समाजात मला व्हिलन करण्याचा त्यांचा प्लॅन होता आणि त्यातून लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात आला होता," असा आरोप नाव न घेता आमदार धस यांनी केला आहे. तर धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांनी जमिनी लाटल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे.