केजच्या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा आरोप; शिक्षण क्षेत्रात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:57 IST2025-09-20T15:57:02+5:302025-09-20T15:57:12+5:30
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; गुन्हा दाखल

केजच्या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा आरोप; शिक्षण क्षेत्रात खळबळ
केज- केज येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 19) रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान पीडित मुलीच्या फिर्यादीवरून उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे यांनी गुन्हा नोंदवला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 18) साडे आठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या नातेवाईकांसोबत रस्त्याने पायी जात होती. यावेळी लक्ष्मण बेडसकर आपल्या कारने तिथे आला आणि मुलीसह तिच्या नातेवाईकांना चहा-पाणी करण्याच्या निमित्ताने कारमध्ये बसवून कोल्हेवाडीकडे नेले. कोल्हेवाडी शिवारातील निर्जन ठिकाणी गाडी थांबवून त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
पीडित मुलगी आणि तिच्या सोबत असलेल्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर लक्ष्मण बेडसकरने दोघींना जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु, त्या वेळी पाठीमागून एक वाहन येताच आरोपीने कार व मोबाईल त्या ठिकाणी सोडून पळ काढला, असे पीडिताने फिर्यादीत सांगितले. घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक बीड यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली. एसपींच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके पुढील करत आहेत.
पूर्वीही विनयभंगाचा प्रयत्न
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीही (दि.15 जुलै) एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या माध्यमातून एका महिलेने लक्ष्मण बेडसकर याच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात केली होती. पण, सदर महिलेने ऐनवेळी घुमजाव केल्यामुळे बेडसकरविरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता.