बीड जिल्ह्यात अर्धामसलानंतर पाचेगावात तणाव; रमजान ईदच्या दिवशीच पोलिसांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:36 IST2025-04-01T11:35:26+5:302025-04-01T11:36:13+5:30
दोन्ही समाजातील लोकांना एकत्रित बोलावून समज काढल्यानंतर हा वाद मिटला.

बीड जिल्ह्यात अर्धामसलानंतर पाचेगावात तणाव; रमजान ईदच्या दिवशीच पोलिसांची धावपळ
गेवराई/पाचेगाव : गेवराई तालुक्यातील अर्धामसला येथील धार्मिक स्थळात स्फोट घडवून आणल्याची घटना ताजी असतानाच पाचेगाव येथे एका मंदिरात भगव्या झेंड्याशेजारी हिरवा झेंडा लावल्याने तणाव निर्माण झाला. रमजान ईदच्या दिवशीच असा प्रकार घडल्याने पोलिसांची धावपळ झाली. परंतु दोन्ही समाजातील लोकांना एकत्रित बोलावून समज काढल्यानंतर हा वाद मिटला. सध्या या दोन्ही गावात पोलिस बंदोबस्त तैनात आहे.
पाचेगाव येथे कानिफनाथ देवस्थान असून, गुढीपाडव्याच्या दिवशी येथे यात्रा भरते. याच ठिकाणी काही लोकांनी भगव्या झेंड्याशेजारी हिरवा झेंडा लावला. तसेच काही फोटोही काढले. हा प्रकार समजताच एका समाजाच्या लोकांनी एकत्र येत निषेध नोंदविला. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. ही माहिती समजताच अपर पाेलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्यासह फौजफाटा गावात पोहोचला. दोन्ही समाजातील लोकांना एकत्रित बोलावून त्यांची समज काढली. त्यानंतर झेंडे काढण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा देत सलोख्याचे दर्शन घडविले. या प्रकरणात पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.
त्या दोघांना पाच दिवस कोठडी
अर्धामसला घटनेतील आरोपी श्रीराम सागडे आणि विजय गव्हाणे या दोन्ही आरोपींना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. तसेच इतर आरोपी कोणी आहेत का? याचाही शोध पोलिस घेत आहेत.
गुलाब देऊन शुभेच्छा
अर्धामसला येथे ईदच्या पूर्वसंध्येला शनिवारी मध्यरात्री धार्मिकस्थळात स्फोट घडविला. त्यानंतर सोमवारी सकाळी ईदच्या अनुषंगाने तलवाडा पोलिसांनी गावात जाऊन धार्मिक स्थळाच्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सपोनि सोमनाथ नरके, उपनिरीक्षक स्वप्नील कोळी यांच्यासह ग्रामस्थही उपस्थित होते.