शेतकऱ्यांच्या अनुदानावर सरकारी बाबूंचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:35 AM2019-01-25T00:35:34+5:302019-01-25T00:35:49+5:30

अनेक गावांमध्ये एकाच शेतक-यांची नावे अनेक वेळा टाकून त्यांच्या नावे जास्तीची अनुदान रक्कम जमा करुन त्यामधून संबंधित गावातील तलाठ्यांनी पैसे लाटल्याचे प्रकार पुढे आले आहे.

Government employees corruption in farmers' subsidy | शेतकऱ्यांच्या अनुदानावर सरकारी बाबूंचा डल्ला

शेतकऱ्यांच्या अनुदानावर सरकारी बाबूंचा डल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात २०१६ साली अतिवृष्टी झाली होती, त्यानुसार अतिवृष्टीबाधित शेतक-यांना ६८ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, अनेक गावांमध्ये एकाच शेतक-यांची नावे अनेक वेळा टाकून त्यांच्या नावे जास्तीची अनुदान रक्कम जमा करुन त्यामधून संबंधित गावातील तलाठ्यांनी पैसे लाटल्याचे प्रकार पुढे आले आहे. असाच प्रकार बीड तालुक्यातील अंधापुरी येथे घडल्याचे शेतक-यांनी सांगितले.
अतिवृष्टीबाधित शेतक-यांचे ६८ कोटी रुपयांचे अनुदान मिळून जवळपास दीड महिना होत आहे. मात्र, अजून देखील जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी वंचित आहेत. तलाठ्याने दिलेल्या यादीनुसारच शेतक-यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम बँकेमार्फत वर्ग करण्यात येते. बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, गेवराई, माजलगाव, धारुर या तालुक्यातील शेतक-यांना हे अनुदान मिळाले आहे. या अनुदानाचा फायदा जवळपास ८५ हजार ८७५ शेतक-यांना होणार होता. एकाच शेतक-यांच्या नावे दोन वेळा पैसे टाकून त्यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा गैरप्रकार बीड तालुक्यातील अंधापुरी येथे समोर आला आहे. तसेच निम्मे पैसे तलाठ्यांने घेतल्याचा आरोप देखील येथील शेतक-यांनी केला आहे.
अंधापुरी येथील शेतक-यांना अतिवृष्टीबाधित शेतक-यांना जवळपास १७ लाख रुपये अनुदान मिळाले होते. त्याचे वाटप देखील सुरु झाले आहे. मात्र, ज्यावेळी यादीमधील नावे गावातील शेतक-यांनी पाहिली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, यादीमध्ये एकाच शेतक-याच्या नावे दोन वेळा अनुदान दिले आहे. तसेच कमी क्षेत्र असतानाही जास्त रक्कम दिली आहे. यासंदर्भात तलाठी हंगे यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती गावातील शेतक-यांनी दिली आहे.
मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
हा गैरप्रकार उघड झाला आहे असे संबंधित गावातील तलाठ्याच्या लक्षात आल्यानंतर ते १ महिन्याच्या सुटीवर गेल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. असाच गैरप्रकार बोंडअळी अनुदान वाटपात देखील झाला होता. या प्रकरणी योग्य चौकशी झाली तर मोठे मासे गळाला लागतील अशी प्रतिक्रिया देखील शेतक-यांनी दिली आहे.

Web Title: Government employees corruption in farmers' subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.