'सरकार मराठा आरक्षण देईना, आर्थिक परिस्थिती बिकट'; युवकाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 15:13 IST2023-12-18T15:10:52+5:302023-12-18T15:13:55+5:30
माजलगाव तालुक्यातील डाके पिंप्री येथील घटना

'सरकार मराठा आरक्षण देईना, आर्थिक परिस्थिती बिकट'; युवकाने संपवले जीवन
माजलगाव (बीड):'आरक्षण मिळत नाही , आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलांना शिक्षण देता येईना', अशी सुसाइड नोट लिहून माजलगाव तालुक्यातील डाके पिंप्री येथील युवकाने रविवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. धर्मराज सखाराम डाके (३८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
माजलगाव तालुक्यातील डाके पिंप्री खुर्द येथील धर्मराज सखाराम डाके (३८) आणि त्याच्या भावात दीड एकर जमीन आहे. धर्मराज हा मुंबई येथे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत असे. परंतु, काही दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परतला होता. येथे आल्यापासून त्याच्या हाताला काहीच काम नव्हते. रविवारी रात्री ६ वाजता घरात कोणी नसताना धर्मराजने अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, त्याच्याजवळ एक सुसाइड नोट मिळाली आहे. सरकार आरक्षण देईना, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलांना शिक्षण देता येईना. यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.