शासकीय कोरोना सेंटरमध्येच ऑक्सिजनची व्यवस्था नाही - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST2021-03-28T04:31:24+5:302021-03-28T04:31:24+5:30
माजलगाव : तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही शासकीय कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने ...

शासकीय कोरोना सेंटरमध्येच ऑक्सिजनची व्यवस्था नाही - A
माजलगाव : तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही शासकीय कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने भीतीपोटी या रुग्णांना खासगी कोरोना सेंटरचा आश्रय घ्यावा लागत आहे, तर अनेकजण बाहेरगावी उपचारासाठी जात आहेत. यामुळे या रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे.
माजलगाव तालुक्यात मे-मध्ये एखाद्या दुसऱ्या ठिकाणी वगळता रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. परंतु, मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघू लागले. माजलगाव शहरापासून २ कि.मी.अंतरावर असलेल्या केसापुरी वसाहत येथे कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरमध्ये केवळ ऑक्सिजन असलेला एकच बेड असल्याने मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठीच याचा वापर केला जातो. जे रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत, त्यांना काही त्रासही नाही. असे रुग्ण या ठिकाणी ऑक्सिजनची सोय नसल्याने अचानक आपल्याला काही झाल्यास या भीतीपोटी अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात जात आहेत. तर अनेक रुग्ण बाहेरगावी जाताना दिसत आहेत.
ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांना खासगी कोरोना सेंटरमध्ये उपचार घेण्याची वेळ आली असून सर्व सामान्यांना हे परवडणारे नाही. मात्र, साधनसामग्री उपलब्ध नसल्याने व परिस्थिती नसताना सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.यासाठी लागणाऱ्या खर्चाची तजवीज म्हणून अनेकांवर खासगी सावकारांचा आधार घेण्याची वेळ आली. याठिकाणी असलेल्या शासकीय कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माजलगाव तालुक्यात दररोज २०-२५ पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मागील पंधरा दिवसांपासून निघत आहेत. त्यामुळे येथील शासकीय कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असायला हवी. मात्र, केवळ ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी केवळ ६०-६५ रूग्ण उपचार घेत आहेत.
येथे कोरोना सेंटरमध्ये फक्त इमर्जन्सी रुग्णांसाठीच ऑक्सिजनची व्यवस्था आहे. बाकीच्या रुग्णांची आम्ही इतरत्र व्यवस्था करत आहोत.
-- डॉ. गजानन रुद्रवार , वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय