गुंडाला गुंड, बंडाला बंड; कोणाला घाबरत नाही: पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 19:28 IST2025-02-11T19:26:15+5:302025-02-11T19:28:11+5:30
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर खूप जणांचे प्रेम वाढले. मंत्री झाले काय आणि नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही.

गुंडाला गुंड, बंडाला बंड; कोणाला घाबरत नाही: पंकजा मुंडे
पाटोदा (जि. बीड) : मी गुंडाला गुंड आहे आणि बंडाला बंड आहे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मात काम करणाऱ्या माणसाने राजकारणात हस्तक्षेप करू नये. काही जणांना स्वतःचे स्वागत स्वतःच करून घ्यायची सवय असते,'' अशी टीका मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
पाटोदा शहराजवळील श्रीक्षेत्र संत मीराबाई संस्थान येथील संत मीराबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मीराबाई संस्थानावर अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. याची सांगता सोमवारी झाली. याप्रसंगी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर खूप जणांचे प्रेम वाढले. मंत्री झाले काय आणि नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. त्या प्रेमाच्या बदलात मी तुम्हाला विकास आणि न्याय देऊ शकते. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे, असे म्हणत त्यांनी आष्टी मतदार संघावर अप्रत्यक्ष दावा केला. यावेळी व्यासपीठावर संत मीराबाई संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज यांच्यासह माजी आमदार, नेत्यांची उपस्थिती होती.
...तर घरच्या गादीवर बसेल
जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही, त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. राजकारणात आणि धर्मकारणात एकमेकांशी नाते असलेच पाहिजे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मकारणात हस्तक्षेप करू नये, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी नवीन पक्ष का काढेल?
दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मी स्वतः मंत्री आहे. असे असताना मी नवीन पक्ष का काढेल? असे पंकजा मुंडे म्हणाल्या.