जिवलग मैत्रिणीने असे का केले? मैत्रिणीच्या नावाने इन्स्टाग्रामवरून इतरांसोबत हाय, हॅलो...
By सोमनाथ खताळ | Updated: June 10, 2023 14:19 IST2023-06-10T14:18:57+5:302023-06-10T14:19:43+5:30
या मुलीने नेमकी कोणाकोणाला आणि काय चॅटिंग केली, याचा शोध सायबर पोलिस घेत आहेत.

जिवलग मैत्रिणीने असे का केले? मैत्रिणीच्या नावाने इन्स्टाग्रामवरून इतरांसोबत हाय, हॅलो...
बीड : दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणीच्या नावाने फेक अकाउंट इन्स्टाग्रामवर उघडले. त्यावरून इतर मित्र, मैत्रिणींशी हाय, हॅलो अशी चॅटिंग केली. हा प्रकार समजताच पीडित मुलीच्या वडिलांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
बीड शहरातील दोन मुली जीवलग मैत्रिणी आहेत. दोघीही एकाच वर्गात असल्याने दोघींच्याही मित्र-मैत्रिणी जवळपास सारख्याच आहेत. त्यातील एकीने दुसरीच्या नावाने इन्स्टाग्रामवर खोटे अकाउंट उघडले. त्यावरून इतर मित्र, मैत्रिणींशी चॅटिंग केली. अनेक दिवस हा प्रकार चालला, परंतु ३० मे रोजी हा प्रकार पीडित मुलीला समजला. तिने लगेच वडिलांना हा प्रकार सांगत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनीही लगेच यावर तांत्रिक तपास करून हे खाते बंद केले, परंतु ओळख लपवून साेशल मीडियावर बदनामी केली म्हणून खाते उघडणाऱ्या मैत्रिणीवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या मुलीने नेमकी कोणाकोणाला आणि काय चॅटिंग केली, याचा शोध सायबर पोलिस घेत आहेत.