धारूर : तालुक्यातील धुनकवाड येथे शेतात विहिरीचे खोदकाम करताना झालेल्या जिलेटिनच्या स्फोटात चार जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यातील दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सूर्यनारायण यादव यांच्या धुनकवाड येथील शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु आहे. शनिवारी सकाळी सात ते आठच्या सुमारास मजूर विहिरीत काम करत होते. यावेळी जिलेटनच्या कांडीचा अचानक स्फोट झाला. यात जमीन मालक भागवत विष्णू यादव (25, रा.धुनकवाड ) यांच्यासह नागनाथ बालासाहेब तोंडे (27), अशोक लक्ष्मण तोंडे (20), बाबुराव राजेभाऊ तोंडे (25) सर्व राहणार देव दहिफळ ) हे तिघे जखमी झाले. त्यांना लागलीच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. चेतन आदमाने, डॉ. परवेज शेख यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना लातूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.