जुगाऱ्यांची ‘दुनियादारी’; पोलिसांमुळे ‘जेलवारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:50 IST2018-12-30T00:48:48+5:302018-12-30T00:50:05+5:30
जुगारात हरल्याने कमालीचे अस्वस्थ असलेले पाच जण एकत्र आले. चांगली मैत्री झाली. पैसा मिळविण्यासाठी त्यांनी रस्त्यात वाहने अडविण्याचा प्लॅन केला. याचा मास्टरमार्इंड हा पोलीस पुत्र आहे.

जुगाऱ्यांची ‘दुनियादारी’; पोलिसांमुळे ‘जेलवारी’
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जुगारात हरल्याने कमालीचे अस्वस्थ असलेले पाच जण एकत्र आले. चांगली मैत्री झाली. पैसा मिळविण्यासाठी त्यांनी रस्त्यात वाहने अडविण्याचा प्लॅन केला. याचा मास्टरमार्इंड हा पोलीस पुत्र आहे. सर्व जुगारी एकत्र आल्याने त्यांची दुनियादारी बनली. २३ डिसेंबरला पिस्तूलचा धाक दाखवून कापसाचा ट्रक लुटला. कापूस विक्री करून ऐश करण्यापूर्वीच या पाचही जणांना पोलिसांनी जेलवारी घडविली. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
राजेश ज्ञानोबा बडे (४०, रा.सिरसाळा) हा पोलीसपुत्र असून तोच टोळीचा म्होरक्या. त्याची जुगार खेळण्यातून अमृत भाऊसाहेब देशमुख (३६, कन्नापूर ता.धारूर) याच्यासोबत मैत्री झाली. त्यानंतर भगवान उर्फ सोनू शेषराव मुंडे (३०, रा. डाबी ता.परळी), आकाश भिमराव गायकवाड (३०, रा.सिरसाळा), दीपक भिमराव केकाण (२४, रा.दिंद्रुड चाटगाव सांगळेवस्ती ता.धारूर) यांच्याशीही त्यांनी गट्टी जमविली. बडे व अमृतला जुगाराची आवड आहे. जुगारात हरल्याने ते तणावाखाली होते. अमृतने तर त्याची जीपही विकली होती. पैसे मिळत नसल्याने आणि जुगाराची आवड असल्याने हे सर्वच चिंतेत होते.
एकेदिवशी बडेच्या डोक्यात कापसाचा ट्रक लुटण्याचा प्लॅन आला. त्याने हा विचार अमृतला बोलून दाखविला. त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र येत गुन्हा करण्याचे ठरविले. परभणी जिल्ह्यात दोन ट्रक लुटल्यानंतर २३ डिसेंबर रोजी त्यांनी आणखी एक ट्रक लुटण्याचा प्लॅन केला. आडस येथून ट्रक (एमएच २० सीटी ११२५) भरताच त्यावर दिवसभर पाळत ठेवली. धारूर घाटात ट्रक येताच बडे, मुंडे व अमृत हे तिघे एका दुचाकीवर बसले. त्यांनी दुचाकी आडवी लावत लिफ्ट मागितली. बडे व अमृत ट्रकमध्ये चढले. चालकाला पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच विविध कंपनीची दारू एकत्रित करून शेख इलियास व बिभीषण फसके या दोघांना पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर अमृतने ट्रक चालविली. परळी रोडवरील एका जिनिंगवर ट्रक नेऊन कापूस विक्री केला. त्यानंतर ट्रक जालना जिल्ह्यात नेवून सोडला. चालकांना शुद्ध येताच त्यांनी हा सर्व प्रकार मालकाला सांगितला. त्यानंतर धारूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एलसीबीचे सपोनि दिलीप तेजनकर यांनी तपास करुन दरोडेखोरांना गजाआड केले.