बीड जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये नुकसानीचे होणार फेर पंचनामे; पालकमंत्री मुंडे यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 19:13 IST2020-10-30T19:11:42+5:302020-10-30T19:13:52+5:30
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दौरा करून झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती.

बीड जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये नुकसानीचे होणार फेर पंचनामे; पालकमंत्री मुंडे यांचे आदेश
परळी : बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी तालुक्यांचा ३३% पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल निरंक असल्याची चर्चा सुरू झाली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या चार तालुक्यातील नुकसानीचे फेर पंचनामे करून सुधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
राज्य शासनाने घोषित केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेज मधून शेतकऱ्यांना थेट मदत मिळण्यासाठी कृषी व महसूल विभागाने केलेले हे पंचनामे महत्वाचे ठरणार आहेत. या पंचनाम्यांमध्ये दोष असून, त्यामुळेच काही तालुक्यातील ३३% पेक्षा जास्त नुकसानीचा अहवाल निरंक असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी व महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची हयगय न करता तातडीने फेर पंचनामे करावेत असे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले आहेत. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, एकही नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी आश्वस्त केले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.