माजलगावात गोवर-रुबेला लसीकरणानंतर चार विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:26 IST2018-12-13T18:22:07+5:302018-12-13T18:26:49+5:30
तालुक्यातील वरोला येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आहे.

माजलगावात गोवर-रुबेला लसीकरणानंतर चार विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
माजलगाव (बीड ) : तालुक्यातील वरोला येथील आश्रम शाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेनंतर चार विध्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तालुक्यातील वरोला येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आहे. या ठिकाणी बुधवारी ( दि. 12 ) गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यात सुमारे 725 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यानंतर काही वेळातच विशाल दत्तात्रय गायकवाड, प्रियांका पांडुरंग राठोड, पूजा रवींद्र राठोड व राधा बळीराम राठोड या चार विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, चकरा येण्यास सुरुवात झाली.
येथे उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. विशाल गायकवाड याला लगेचच उपचारासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर विधार्थिनींची परिस्थिती सुधारल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. परंतु आज सकाळी 10 वाजता शाळेच्या वेळेत या तिन्ही विद्यार्थिनी शाळेत आल्या असता त्यांना वर्गातच अचानक त्रास सुरू झाला. शाळेतील शिक्षकानी तात्काळ त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या वेळी डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
प्रकृती सुधारली आहे
ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या त्यांच्यार बीड येथे उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती सुधारली आहे.
- डॉ. अनिल परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी