वीट भट्टी चालकास लाचेची मागणी करणारे चार पोलिस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:40 IST2020-04-24T17:39:57+5:302020-04-24T17:40:25+5:30
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची कारवाई

वीट भट्टी चालकास लाचेची मागणी करणारे चार पोलिस निलंबित
परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिवनावश्यक वस्तूंचे व्यावसाय सोडून इतरांना परवानगी नाही. मात्र, ‘तुमची वीटभट्टी सुरु कशी’ असे म्हणत दमदाटी करून वीटभट्टी चालकाकडून लाचेची मागणी करणाऱ्या चार पोलीस शिपायांचे निलंबन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केली.
परळी तालुक्यातील सारडगाव येथील येथील विटभट्टीवर १८ एप्रिल रोजी रात्र गस्तीवर असलेले परळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस शिपाई एस.बी चिंदमवार, जी.ए.येरडलावार, एस.एन एकुलवार, पी.एस पांचाळ हे गेले होते. यावेळी वीटभट्टीवर सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी मजूर झोपलेले होते. ही वीटभट्टी सुरु असल्याचे सांगून, तुमच्यावर कारवाई करू असे म्हणत वीटभट्टी मालक मधुकर डोळे यांच्याकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान १० हजार रुपये घेऊन तेथून चौघे पोलीस शिपाई निघून गेले. यावेळी त्यांनी मजुरांना मारहाण केली होती.
याप्रकरणी मधुकर डोळे यांनी पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्याकडे चारही लाचखोर पोलिसांची तक्रार केली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी चौकशी करून अहवाल पोलीस अधीक्षक कायालर्यात पाठवला. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व तपासणी करून २२ एप्रिल रोजी पोलीस शिपाई, एस.बी.चिंदमवार, जी.ए. येरडलावार, एस.एन एकुलवार, पी.एस.पांचाळ यांना निलंबित केले.
आमदार संजय दौंड यांनी घेतली दखल
वीटभट्टीचालक मधुकर डोळे यांनी घडलेला सर्व प्रकार आ. संजय दौंड यांच्या कानावर घातला होता. त्यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे याची दखल घेत तात्काळ कारवाई करण्यात आली.