Four more farmers commit suicide in Marathwada | मराठवाड्यात आणखी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाड्यात आणखी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आष्टी/अंबाजोगाई/केज (जि. बीड)/येडशी (जि. उस्मानाबाद) : आर्थिक कणा मोडल्याने कोलमडून पडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नसून गेल्या पंधरवड्यापासून त्यात मोठी वाढ झाली आहे. रविवारीही चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली. यात बीड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश असून चौथी घटना ही उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. 

पहिल्या घटनेत बीड जिल्ह्यातील शेकापूर (ता. आष्टी) येथील जालिंदर नामदेव शिंदे (५२) या शेतकऱ्याने नापिकी व खाजगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेतला. जालिंदर शिंदे हे शेतातील काही हाती लागले नसल्याने नैराश्यात होते. यातच त्यांनी जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणाची नोंद आष्टी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पो. हवालदार नवनाथ काळे हे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत पिंपळा धायगुडा (ता. अंबाजोगाई) येथील प्रताप मोहनराव धायगुडे (४०) या शेतकऱ्याने आत्महत्या केली.प्रताप धायगुडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त झाले होते. आर्थिक विवंचनेतून ते नेहमी तणावात असत. अखेर त्यांनी शनिवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
तिसऱ्या घटनेत येवता (ता.केज) येथील  विष्णूपंत कुंडलिक काळे (५२) या शेतकऱ्याने शनिवारी रात्री कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री घडली. परतीच्या पावसाने हातात आलेली पिके हातची गेली. त्यामुळे मुलींच्या लग्नासाठी घेतलेले बँकेचे कर्ज कसे फेडावे. कुटुंबाचा उदरिनर्वाह कसा चालवावा या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली असा परिवार आहे.  

उस्मानाबादेत तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास
उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथील सचिन विजयसिंह वीर (२६) या तरुण शेतकऱ्याने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजता घडली.सचिन वीर यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादन खर्चही हाती पडतो की नाही, या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि. बी.बी. नाईकनवरे व हेकॉ. विजयानंद साखरे यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हेकॉ. साखरे हे करीत आहेत.

Web Title: Four more farmers commit suicide in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.