वैद्यनाथ कारखान्याच्या चोरी प्रकरणात चार जण गजाआड; आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 14:59 IST2020-12-24T14:57:26+5:302020-12-24T14:59:44+5:30
crime news in Beed अटक करण्यात आलेले चारपैकी तिघे परळीतील व एक लातूरचा आहे.

वैद्यनाथ कारखान्याच्या चोरी प्रकरणात चार जण गजाआड; आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता
परळी : वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या ३७ लाख ९४ हजार रुपयांच्या साहित्य चोरी प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात परळी ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेले चारपैकी तिघे परळीतील व एक लातूरचा आहे.
परळी तालक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशाॅप गोदामातून नुकतेच संगणक संच, माॅनिटर, काॅपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरटयांनी ऑक्टोंबर 2020 मध्ये लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे ३७ लाख ९४ हजार ९१४ इतकी होती. कारखान्याचे लिपीक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलिसांनी भादवि ४६१,३८० कलमान्वये दि.22 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली .
तपासा दरम्यान पोलिसांनी बुधवारी (दि.23) रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा. परळी) व मुतजीन मुनीर शेख रा. लातूर यांना अटक केली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल उर्फ मंगलदादा शेख रा. परळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे याचा तपास परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक शिवलाल पूर्भे हे करीत आहेत. आरोपींच्या चौकशीतून आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चोरी प्रकरणात एका नगरसेविकेच्या पतीचाही समावेश असून तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.