अंबाजोगाईत उत्खननातून मंदिराचा लागला शोध; रंगशिळा, दुर्मिळ मूर्ती सापडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:24 IST2018-03-29T15:24:11+5:302018-03-29T15:24:11+5:30
शहरातील पुरातन व ऐतिहासिक असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम चालू झाले आहे. या उत्खननात एका मंदिराचा शोध लागला आहे.

अंबाजोगाईत उत्खननातून मंदिराचा लागला शोध; रंगशिळा, दुर्मिळ मूर्ती सापडल्या
- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई (बीड) : शहरातील पुरातन व ऐतिहासिक असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम चालू झाले आहे. या उत्खननात एका मंदिराचा शोध लागला आहे. उत्खनन सुरू असतांना नवीन मंदिराची रंगशिळा निघाली तर अनेक दुर्मिळ मूर्तींसह नवनवीन अवशेष हाती लागू लागले आहेत.
११ व्या शतकातील यादवकालीन व चालुक्यांचा प्रभाव असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयच्या वतीने १८ मार्चपासून उत्खननाचे काम सुरू झाले आहे. मंदिराच्या उत्तर व दक्षिण बाजूने उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन सुरू होताच उत्तर बाजूला नवे मंदिर सापडले. ढिगाऱ्याखाली दडलेल्या या मंदिराची मोठी रंगशिळा पायाभागात निघाली तर द्वारशाखेच्या बाजूला असणारी एक विष्णूची पुरातन सुंदर अशी मूर्ती सापडली आहे. तसेच चुन्यापासून तयार केलेल्या मूर्तीचे भाग, तत्कालिन खापरी भांडयाचे तुकडे, दगडाप्रमाणेच घडविलेल्या विटा, अशा अनेक दुर्मिळ वस्तू उत्खननातून निघाल्या आहेत. तर दक्षिण-पश्चिम बाजूस झालेल्या उत्खननात दगडी शिळेच्या पुरातन पायऱ्या निघाल्या.
या पायऱ्यांवर गजधर आढळून आलेला आहे. तर मंदिराच्या पूर्वेकडे समोरील बाजूस मोठे कुंड असून या कुंडाचे खोदकामही होणार आहे. पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक कार्यालयातील सहा अधिकारी व कर्मचारी यांचे पथक अंबाजोगाईत तळ ठोकून आहेत. यात तंत्रसहाय्यक, निलिमा मार्केडे, पुरातत्व समन्वयक मयुरेश खडके, स्नेहाली खडके, कामाजी डक, मुश्रीफ पठाण, सर्वेक्षक प्रल्हाद सोनकांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खननाचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे.
तीन मंदिरांची शृंखला
संकलेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खननाचे काम सुरू झाल्यानंतर एक नवीन मंदिर उत्खननातून पुढे आले. सध्या असलेल्या संकलेश्वर मंदिराच्या उत्तर बाजूस दोन्ही मंदिरे असावीत असा अंदाज पुरातत्व खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शिवमंदिराच्या बाजूला तीन मंदिरे असल्याचा शोध ठिकठिकाणी लागलेला आहे. याही ठिकाणी तीन मंदिरांची शृंखला असावी असा अंदाज वर्तवून उत्खननाचे काम सुरूच आहे.
‘त्या’ ७० ते ८० मुर्त्या सुरक्षित
दीड वर्षापूर्वी अंबाजोगाई येथील काही हौसी नागरिकांनी संकलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवितांना जेसीबीच्या सहाय्याने मंदिर परिसरातील मुर्त्या हलविल्या या प्रकारामुळे मुर्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. ही घटना पुरातत्व खात्याला कळाल्यानंतर पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी दखल घेऊन त्या मुर्त्या सुरक्षित स्थळी हलविल्या.आता पुरातत्व विभागाने तयार केलेल्या नवीन शेडमध्ये त्या मुर्त्या स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. त्या सर्व मुर्त्या सुरसुंदरी,साधक, विष्णू, शिव यांच्या असून बऱ्याच मुर्त्यांची झीज झाल्याने त्या ओळखता येत नाहीत. मात्र, या सर्व मुर्त्यांवर दक्षिणात्य शिल्प शैलीचा प्रभाव दिसून येतो.