केज (जि. बीड) : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या मकोका अतिजलद न्यायालयात बुधवारी सकाळी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ओळख परेडसाठी हजर केले. यावेळी आरोपींच्या वकिलाने आमची तयारी नाही, म्हणून पुढील तारखेची मागणी केली. यानंतर पुढील सुनावणी २६ मार्चला होणार असल्याचा निर्णय न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी दिला.
सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याची चौकशी सीआयडी व एसआयटीने करून ८० दिवसांत मकोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तेथून हे दोषारोपपत्र केज येथील न्यायालयात वर्ग केले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता सरपंच हत्या, खंडणी व ॲट्रॉसिटी या तीनही गुन्ह्यांच्या पहिल्या सुनावणीला सुरुवात झाली.
ॲड. निकम यांची मुंबईत घेणार भेट : धनंजय देशमुख
विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेले ॲड. उज्ज्वल निकम हे या सुनावणीला गैरहजर होते. पुढील सुनावणीला ते हजर राहतील, असे सहायक सरकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितले.
ॲड. निकम यांची भेट घेण्यासाठी लवकरच मुंबईला जाणार असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. पहिल्या सुनावणीला सीआयडी व एसआयटीचे अधिकारी व तपास अधिकारी गैरहजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाल्मीक कराडने हात जोडले : आरोपींना ओळख परेडसाठी व्हीसीद्वारे न्यायालयासमोर हजर केले असताना मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हा हात जोडून उभा असल्याचे चित्र दिसले.
आरोपीचे वकील काय म्हणाले? : आरोपपत्रामध्ये फोन कॉल्सचा उल्लेख आहे. खंडणी, हत्या काळातले सीडीआर तपास यंत्रणांना मिळालेले आहेत. ते सीडीआर आम्हाला द्यावेत.
सरकारी वकील काय म्हणाले? : २६ मार्चला सरकारी पक्ष म्हणणे मांडेल. साक्षीदार, आरोपींचे जबाब मिळण्यास इतका उशीर का करता, असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी विचारला.