आधी आव्हान अन् आता म्हणतो पोलिस माझेच; निलंबित पीएसआय कासलेचा शरण येण्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:55 IST2025-04-17T14:54:58+5:302025-04-17T14:55:28+5:30
रणजित कासले हा सायबर पोलिस ठाण्यात असताना विनापरवानगी आरोपीला घेऊन गुजरातमध्ये गेला होता. तेथे पैसे घेतल्याचा आरोपाची चौकशीकरून पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले

आधी आव्हान अन् आता म्हणतो पोलिस माझेच; निलंबित पीएसआय कासलेचा शरण येण्याचा दावा
बीड : येथील सायबर पोलिस ठाण्यातील वादग्रस्त निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याने हिंमत असेल तर पकडून दाखवा, असे म्हणत महाराष्ट्र पोलिसांना आव्हान दिले होते. त्यानंतर बुधवारी त्याने पोलिस माझेच आहेत, असे म्हणत आपण पुण्यात गुरुवारी सकाळी बीड पोलिसांना शरण येणार असल्याचा दावा केला आहे. याचा एक व्हिडीओ कासले याने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
रणजित कासले हा सायबर पोलिस ठाण्यात असताना विनापरवानगी आरोपीला घेऊन गुजरातमध्ये गेला होता. तेथे त्याने पैसे घेतल्याचा आरोप त्याच्यावर झाला. याची चौकशी करून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कासलेला २६ मार्च रोजी निलंबित केले होते. त्यानंतर कासलेने एकापाठोपाठ एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आपले वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर आरोप केले होते. वाल्मीक कराड याच्या एन्काउंटरसाठीही आपल्याला विचारणा झाल्याचा सणसणाटी दावाही त्याने केला होता. असेच व्हिडीओ व्हायरल करीत असताना त्याने एका समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी बीडमधील वकिलाच्या फिर्यादीवरून १४ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, १५ एप्रिल रोजी त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. मी २० वर्षे पोलिस खात्यात नोकरी केली आहे. सायबर पोलिस ठाण्यातही काम केले आहे. त्यामुळे मी रोज दोन मोबाइल, दोन सीमकार्ड बदलतो. दोन गाड्या, राज्यही बदलतो. मला सर्व काही माहिती आहे. त्यामुळे हिंमत असेल तर मला पकडून दाखवावे, असे आव्हान कासले याने महाराष्ट्र पाेलिसांना व्हिडीओतून दिले होते. परंतु, बुधवारी सकाळी दुसरा व्हिडीओ अपलोड करून त्याने आपण बीड पाेलिसांना शरण येणार असे सांगितले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप
कासले याने सुरुवातीपासूनच आ. धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्यावर आरोप केले. आतादेखील त्याने मुंडे यांच्यावर आरोप केले. ते आता भाजपमध्ये जाऊन क्लीन होऊन येतील. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ असल्याचा दावाही कासलेने केला आहे.
कासलेमुळे बीड पोलिस बदनाम
कासले हा वादग्रस्त आहे. त्याचे निलंबन झाल्यावर त्याने दारूच्या नशेत अनेक व्हिडीओ करत अनेक सणसणाटी दावे केले. हे व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाल्याने बीड पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. अगोदरच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांवर टीका झाली होती. ते सुरू असतानाच कासले याने नवीन कारनामे केल्याने पोलिस दल बदनाम होत आहे.