अखेर वनवेवाडीत बिबट्या जेरबंद; महिलेच्या नरडीचा घोट घेणारा हाच की दूसरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:43 IST2025-02-12T19:41:42+5:302025-02-12T19:43:15+5:30

विहिरीत पडला अन् पकडला; ५ दिवसांपूर्वी कारेगाव, मेंगडेवाडीत बिबट्याने केला होता हल्ला, यात एका महिलेचा मृत्यू झाला होता

Finally, a leopard is captured in Vanvewadi; Is it the one who took the woman's life or someone else? | अखेर वनवेवाडीत बिबट्या जेरबंद; महिलेच्या नरडीचा घोट घेणारा हाच की दूसरा?

अखेर वनवेवाडीत बिबट्या जेरबंद; महिलेच्या नरडीचा घोट घेणारा हाच की दूसरा?

पाटोदा : आष्टी तालुक्यातील मातावळी, वनवेवाडी तसेच भुरेवाडी परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून वावरणारा बिबट्या अखेर आष्टी उपवन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाडसी मोहीम राबवत जेरबंद केला. पाटोदा तालुक्यातील कारेगाव व मेंगडेवाडी येथे हल्ला करणारा हाच बिबट्या आहे का? याबाबत वनविभागाकडून पुष्टी मिळालेली नाही.

आष्टी, पाटोदा तालुक्यामध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील युवकावर पाच दिवसांपूर्वीच बिबट्याने हल्ला केला होता, तर त्याच दिवशी मेंगडेवाडी येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर वनवेवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले. वनविभागाने राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. बिबट्या पकडल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या मनातील भीती व दहशत कमी होणार आहे.

विहिरीत पडला अन् पकडला
वनवेवाडी परिसरात बिबट्या विहिरीमध्ये पडल्याचे तेथील ग्रामस्थांनी वनविभागाला संपर्क करून माहिती दिली. आष्टी उपवन विभागातील कर्मचारी व सौताडा येथील वनविभागाचे कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले. तब्बल दोन ते तीन तास हे ऑपरेशन चालू होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये आष्टी उपवन विभागाचे जायभाय, यादव तागड, काळे, आरगडे, पंदेलवाड, शिंदे, विधाते, अशोक खामकर, भाऊसाहेब पेचे, नवनाथ उबाळे, शहादेव टेकाळे, युनुस शेख, हरिभाऊ वनवे आदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Web Title: Finally, a leopard is captured in Vanvewadi; Is it the one who took the woman's life or someone else?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.