मोबाईलवरून महिलेशी अश्लील संभाषण करणाऱ्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 19:27 IST2019-03-02T19:27:01+5:302019-03-02T19:27:50+5:30
अश्लील संभाषण केले आणि मेसेज पाठवून त्रास दिल्याप्रकरणी अज्ञातावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाईलवरून महिलेशी अश्लील संभाषण करणाऱ्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
अंबाजोगाई : शहरातील एका महिलेस मोबाईलवर कॉल करून अश्लील संभाषण केले आणि मेसेज पाठवून त्रास दिल्याप्रकरणी अज्ञातावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
ही महिला एका पतसंस्थेतील कर्मचारी आहे. बुधवारी त्या पतसंस्थेत दैनंदिन कामकाज करत असताना एका मोबाईल क्रमांकावरून त्यांना कॉल आला आणि तो व्यक्ती त्यांच्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न करू लागला. सदरील महिलेने रॉंग नंबर असल्याचे सांगितल्या नंतरही त्या व्यक्तीने निरर्थक संभाषण सुरूच ठेवले. सायंकाळी पुन्हा त्या व्यक्तीने कॉल करून त्या महिलेस त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी ही बाब पती आणि दिराच्या कानावर घातली.
त्यांनतर शुक्रवारी रात्री पुन्हा त्या व्यक्तीने फोन करून अश्लील संभाषण केले. अखेर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत महिलेने अंबाजोगाई शहर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरिक्षक कांबळे पुढील तपास करत आहेत.