पोलीस उपअधीक्षक सुनिल जायभायेंवर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची ठिय्या आंदोलनात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 19:31 IST2021-07-08T19:31:25+5:302021-07-08T19:31:57+5:30

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

File a case against Deputy Superintendent of Police Sunil Jayabhaye; Demand of Maratha Kranti Morcha in Theya Andolan | पोलीस उपअधीक्षक सुनिल जायभायेंवर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची ठिय्या आंदोलनात मागणी

पोलीस उपअधीक्षक सुनिल जायभायेंवर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची ठिय्या आंदोलनात मागणी

ठळक मुद्देविविध पक्ष व संघटनांचा आंदोलनास पाठींबा

अंबाजोगाई : पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या प्रतिष्ठीत व्यक्तीस बेदम मारहाण करून अर्वाच्च भाषेत व जातीवर शिव्या दिल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करा या मागणीसाठी बुधवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरूवारीही सुरूच होते. उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनाची व्याप्ती आता वाढली असून अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यात सर्वत्र आंदोलनाचे लोण पसरले असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अ‍ॅड.माधव जाधव यांनी दिली आहे.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अंबाजोगाई शहरातील डॉ.सुहास यादव यांना जाणीवपूर्वक गुंतविण्यात आले आहे असे उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. डॉ.सुहास यादव यांचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल जायभाये व त्यांचे सहकारी यादव कुटूंबियांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. मंगळवारी रात्री या प्रकरणाचा तपास करताना डॉ.सुहास यादव यांचे चुलत भाऊ विलास यादव यांना पोलिस अधिकार्‍यांनी प्रशांतनगर भागात बेदम मारहाण व शिविगाळ केली, अर्वाच्च भाषा वापरली. त्यानंतर यादव यांना बळजबरीने पोलीस ठाण्यात नेऊन तिथे पुन्हा मारहाण करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी हे जाणीवपूर्वक यादव कुटूंबियांना त्रास देत आहेत असे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांवर मारहाणीचे गुन्हे दाखल करावेत व त्यांना सेवेतुन निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी बुधवारपासून मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देखिल उपजिल्हाधिकारी यांना दिले आहे. 

याबाबत वरीष्ठ अधिकार्‍यांशी बोलताना जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख म्हणाले की,या प्रकरणाची सखोल चौकशी करावी,उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांवर मारहाणीचे गुन्हे दाखल करावेत व त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी मराठा क्रांती मोर्चाची प्रमुख मागणी आहे. या मागणीचा विचार करून तात्काळ जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी. कारण, या प्रकरणात चौकशीच्या नावाखाली पोलिस प्रशासनाने विलास यादव यांना नाहक मारहाण करण्यात आली आहे हे योग्य नाही. तर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माधव जाधव यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी सुरू झालेले ठिय्या आंदोलन गुरूवार रोजी ही सुरूच आहे. मागण्या मान्य केल्याशिवाय व यादव कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. गुरूवारपासून आजूबाजूच्या गावातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत. या आंदोलनाची व्याप्ती आता आणखी वाढली असून अंबाजोगाई तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील कार्यकर्ते देखील ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत, असे समन्वयक जाधव म्हणाले. 

केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार  नमिता मुंदडा यांनी ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री  दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन या  प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांना  दिली असून गृहमंत्री यांनी कार्यवाहीचे आश्वासन देऊन वरीष्ठ अधिकार्‍यांना सूचना दिल्या असल्याची माहिती भाजपाचे जेष्ठ नेते  नंदकिशोर मुंदडा यांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन दिली.या आंदोलनात गुरूवार रोजी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अ‍ॅड.माधव जाधव, नंदकिशोर मुंदडा, अशोकराव देशमुख, अशोक गुंजाळ, राजेसाहेब देशमुख,नगरसेवक बबन लोमटे,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंत मोरे,नगरसेवक सारंग पुजारी,डॉ.नंदकिशोर सोमवंशी,अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, अ‍ॅड.अजित लोमटे, आबासाहेब पांडे,महेश लोमटे,प्रा.प्रशांत जगताप,संजय भोसले,वैजेनाथ देशमुख,प्रविण ठोंबरे,अ‍ॅड.संतोष लोमटे,राहूल मोरे,प्रशांत आदनाक,गोविंद पोतंगले,ज्ञानोबा कदम,अ‍ॅड.रणजित सोळंके,बालाजी शेरेकर,रविकिरण देशमुख,भीमसेन लोमटे,विजयकुमार गंगणे,विजय भोसले,अंगद गायकवाड,धर्मराज सोळंके,स्वप्निल सोनवणे, लहु शिंदे, बालासाहेब शिंदे,राणा चव्हाण,प्रकाश बोरगावकर,अ‍ॅड.प्रशांत शिंदे,अभिजीत लोमटे,अ‍ॅड.भागवत गाठाळ,ईश्वर शिंदे, रणजित डांगे,श्रीकांत कदम,अतुल जाधव, महेश जगताप, राजकुमार गंगणे, संजय कदम यांच्यासह चनई व मोरेवाडी येथील मराठा समाज बांधव,कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे 
९ जुलै रोजी तळेगाव घाट,हातोला आणि बर्दापुर तसेच १० जुलै रोजी जवळगाव,पुस, गिरवली,धायगुडा पिंपळा आणि मगरवाडी येथील मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलनास केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा,वंचित बहुजन आघाडी,क्षत्रीय मराठा,महाराष्ट्र कुणबी मराठा महासंघ,अखिल भारतीय किसान काँग्रेस आणि लोकजनशक्ती पार्टी यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.जिल्ह्यातील बीड, परळी,धारूर येथेही गुरूवारी या प्रश्‍नी प्रशासनास निवेदने देण्यात आली.अंबाजोगाई येथील ठिय्या आंदोलनास महाराष्ट्रातुन वाढता पाठींबा मिळत आहे.

Web Title: File a case against Deputy Superintendent of Police Sunil Jayabhaye; Demand of Maratha Kranti Morcha in Theya Andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.