वडिलांचा मारहाणीत मृत्यू; आरोपींच्या अटकेसाठी मुलींनी अडविली पालकमंत्र्यांची गाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:38 IST2022-02-08T18:38:29+5:302022-02-08T18:38:38+5:30
पोलिस योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप करत मयत व्यक्तीच्या मुलींनी धनंजय मुंडे यांची गाडी अडवली आणि आरोपींच्या अटकेची मागणी केली.

वडिलांचा मारहाणीत मृत्यू; आरोपींच्या अटकेसाठी मुलींनी अडविली पालकमंत्र्यांची गाडी
बीड: वडिलांचा मारहाणीत मृत्यू झाला, पण आरोपींच्या बचावासाठी पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोप करत मयत व्यक्तीच्या दोन मुलींनी बीडचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची गाडी अडवली.
सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे संभाजी वडचकर हे मारहाणीत गंभीर जखमी झाले होते. पण, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू झाल्यानंतरही पोलिसांनी 302 कलम वाढविलेले नाही. वडवणी पोलीस आरोपींची पाठराखण करत आहे, असा आरोप कुटुंबियांनी केला.
दरम्यान, धनंजय मुंडे दौऱ्यावर आले अशता, मयत वडचकर यांच्या किर्ती व प्रिती या दोन मुलींनी पालकमंत्र्यांची गाडी अडवली आणि आरोपींच्या अटकेची मागणी केली. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी यापूर्वी दोनवेळा वडचकर कुटुंबियांना आश्वासन दिले आहे. पण, अद्यापही काहीच कारवाई न झाल्याने या मुलींनी संताप व्यक्त केलाय.