वैद्यनाथ साखर कारखाना कवडीमोल भावात विकला; कामगार, सभासदांना फसवल्याचा आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:40 IST2025-10-13T13:39:40+5:302025-10-13T13:40:31+5:30
शासनाचे भागभांडवल आणि कर्ज असतानाही विक्री? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, बेकायदेशीर फेरफार रद्द करण्याची मागणी

वैद्यनाथ साखर कारखाना कवडीमोल भावात विकला; कामगार, सभासदांना फसवल्याचा आरोप!
बीड : परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची बेकायदेशीर पद्धतीने विक्री केली आहे. कवडीमोल भावात कारखान्याची विक्री करून शेतकरी, सभासद, कामगार व शासनाची फसवणूक केल्याचा आरोप ॲड. परमेश्वर गित्ते यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, बेकायदेशीर फेरफार रद्द करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारीनुसार, वैद्यनाथ कारखान्याचे बेकायदेशीर, ऑफलाइन खरेदीखत करून १३१ कोटी ९८ लाख रुपयांत हा कारखाना ओंकार साखर कारखान्यास विक्री केला आहे. ही नोंदणी अंबाजोगाई येथील सहदुय्यम निबंधक यांनी नोंदवली आहे. विशेष म्हणजे, या खरेदी खतामुळे झालेले फेरफार मंडल अधिकाऱ्यांनी कोणतीही सुनावणी न घेता मंजूर केल्याने विश्वासघात झाल्याचा आरोप ॲड. गित्ते यांनी केला आहे. या संदर्भात ओंकार कारखाना व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.
कर्ज आणि बोजे असतानाही व्यवहार
कारखान्याच्या सातबारा उताऱ्यावर शासनाचे भाग भांडवल ६६७ लाख, शासकीय कर्ज १०१३ लाख आणि राज्यकर आयुक्त, बीड यांचे २७.६१ कोटी व ३८ कोटी ९१ लाख असे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बोजे असतानाही, संबंधित बँक, राज्य शासन आणि राज्य कर आयुक्तांची ‘ना हरकत’ घेतली नाही. तरीही सह दुय्यम निबंधक, अंबाजोगाई यांनी ऑफलाइन पद्धतीने खरेदीखत नोंदवून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ॲड. परमेश्वर गित्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून बेकायदेशीर खरेदीखत दस्त आणि मंजूर झालेले सर्व फेरफार त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.
स्पर्धात्मक लिलाव न झाल्याचा आरोप
वैद्यनाथ कारखान्याचे संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी सभासद, हितचिंतक व कामगारांना विश्वासात न घेता कारखाना कर्जबाजारी केला आणि बँकेमार्फत कवडीमोल भावाने विक्री केला. विक्रीसाठी काढलेल्या लिलावात कोणीही सहभाग घेतला नाही. त्यामुळे स्पर्धात्मक किंमत झाली नाही आणि केवळ ओंकार साखर कारखाना प्रा.लि. यांनी युनियन बँक ऑफ इंडिया आणि वैद्यनाथ कारखान्याशी संगनमत करून स्पर्धात्मक लिलाव न करता कोट्यवधी रुपयांची कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेतल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
कामगार, शेतकरी आणि सभासदांचे प्रश्न अनुत्तरीत
या बेकायदेशीर खरेदीखतामुळे कामगार, वकिलांचे मानधन, शेतकऱ्यांचे व ठेकेदारांचे देणे तसेच सभासदांचे शेअर्स, भागभांडवल याची रक्कम कोण देणार, याबाबत खरेदीखतात कोणतीही स्पष्टता नाही. तसेच, सभासदांचे भागभांडवल ओंकार साखर कारखान्यात रूपांतरित होणार की नाही, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. दीड वर्षापासून कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिला असल्याची चर्चा होती. मात्र, आता हा कारखाना कायमस्वरूपी विक्री झाल्याचे समोर आले आहे.