पिक विम्यासाठी कृषीदिनी शेतकऱ्यांचे चुलबंद अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 17:06 IST2021-07-01T17:04:38+5:302021-07-01T17:06:45+5:30
तालुक्यातील खतगव्हाण येथे पिक विमा मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी चुलबंदची हाक दिली होती.

पिक विम्यासाठी कृषीदिनी शेतकऱ्यांचे चुलबंद अन्नत्याग आंदोलन
माजलगाव : मागील दोन वर्षांपासुन जिल्ह्यातील शेतक-यांना पिक विम्यापासुन वंचित रहावे लागत आहे. शेतक-यांना पिक विमा मिळावा यासाठी शासनाने अॅग्रीकल्चर ईन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र, दोन वर्षांपासून शेतक-यांना पिक विमा मिळालेला नाही. या मागणीसाठी तालुक्यातील खतगव्हाण येथे शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने गुरूवारी (ता. 1) चुलबंद आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील खतगव्हाण येथे पिक विमा मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी चुलबंदची हाक दिली होती. कृषी दिन व संत जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाचा दिवस आहे. तुकाराम महाराजांची पालखी आज प्रस्थान करत असते. त्याचाच एक भाग म्हणुन पात्रुड व कान्सुर येथील दोन दिंड्या एकत्र येत खतगव्हाणमध्ये जिल्ह्यातील शेतक-यांना 2020 - 21 चा विमा मिळावा या मागणीसाठी चुलबंद आंदोलन करत गावातून दिंडी काढत अनोखे आंदोलन केले.
जिल्ह्यातील शेतक-यांनी ६० कोटी तर केंद्र शासनाने व राज्य शासनाचे 800 कोटी असा 860 कोटी रूपयांचा पिकविमा भरलेला आहे. मात्र फक्त तेरा कोटी रूपयेच परतावा मिळाला आहे. शेतक-यांनी याप्रकरणी वेळोवेळी आंदोलन करत परताव्याची मागणी केली तरी शासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. यामुळे खतगव्हाण येथे शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली चुलबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुरली बुरंगे, शहाजी बुरंगे, गजानन बुरंगे, प्रताप बुरंगे, अर्जुन पायघन, सदाशिव पायघन, दत्ता तसनुसे आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.