एसबीआयसमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 23:22 IST2020-03-13T23:22:02+5:302020-03-13T23:22:39+5:30
बॅँकेतील कामकाज, व्यवहार मराठी भाषेत करावा, अवाजवी व्याजाची आकारणी तसेच नोटीस खर्च व दंडाची वसुली करु नये या व अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी येथील एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

एसबीआयसमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
बीड : बॅँकेतील कामकाज, व्यवहार मराठी भाषेत करावा, अवाजवी व्याजाची आकारणी तसेच नोटीस खर्च व दंडाची वसुली करु नये या व अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी येथील एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
या संदर्भात आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहक व शेतक-यांच्या लूटप्रकरणी माजलगाव येथील एसबीआयच्या शाखेत ८ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले. शेतकरी, गृह व इतर कर्जदारांना अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारत आहे. बॅँकेतील व्यवहार इंग्रजीमध्ये चालत आहे. सामान्य व शेतकºयांना इंग्रजी समजू शकत नाही त्यामुळे स्वाक्षरी केलेल्या कागदाआधारे मनमानी केली जात असल्याची तक्रार निवेदनात केली होती. मागण्यांसंदर्भात ग्राहक व शेतकºयांची लूट बॅँकेकडून कशी व कुठल्या प्रकारे होते, याचा सविस्तर तपशील बॅँकेने आंदोलकांना मागितला. या मुद्यावर कुठल्याही ग्राहकाने तक्रार केलेली नसल्याचे सहाय्यक महाप्रबंधक भोसले यांनी आंदोलकांना दिलेलया पत्रात नमूद केले आहे. व्यवहार मराठी भाषेत करण्याचा अधिकार बॅँकेच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयाला असल्याचे या पत्रात स्पष्ट केले आहे. कुठल्याही प्रकारचे कर्ज मंजूर करताना बॅँक ग्राहकाला सर्व अटी, नियम सविस्तर समजावून सांगून त्याची व्यवस्था पत्रावर स्वाक्षरी घेऊन पुष्टी केली जाते, असे बॅँकेच्या वतीने कळविण्यात आले. दरम्यान दिलेल्या निवेदनानुसार सर्व व्यवहार मराठीत करण्यात यावेत तसेच अवाजवी वसुली व त्याचे चार्जेस रद्द करावेत या मागण्यांबाबत न्याय न मिळाल्यास २३ मार्च रोजी टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.