खतगव्हाणमध्ये शेतकऱ्यांचे चूलबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:26+5:302021-07-02T04:23:26+5:30
माजलगाव : दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कृषिदिनी तालुक्यातील खतगव्हाण येथे चूलबंद व ...

खतगव्हाणमध्ये शेतकऱ्यांचे चूलबंद आंदोलन
माजलगाव : दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कृषिदिनी तालुक्यातील खतगव्हाण येथे चूलबंद व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी शासनाने ‘ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया’ या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र, पीकविमा मिळालेला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठ कोटी, तर केंद्र शासन व राज्य शासनाचे ८०० कोटी, असा ८६० कोटी रुपयांचा पीकविमा भरलेला असून, त्याचा परतावा मात्र फक्त तेरा कोटी रुपयेच मिळाला आहे. शेतकऱ्यांनी याप्रकरणी वेगवेगळे आंदोलन केले असले तरी शासनाने मात्र कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे खतगव्हाण येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली चूलबंद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मुरली बुरंगे, शहाजी बुरंगे, गजानन बुरंगे, प्रताप बुरंगे, अर्जुन पायघन, सदाशिव पायघन, दत्ता तसनुसे आदी शेतकरी सहभागी झाले होते.
-------
दोन दिंड्या एकत्र काढून आंदोलन
तुकाराम महाराजांची पालखी १ जुलै रोजी प्रस्थान करत असते. त्याचाच एक भाग म्हणून पात्रूड व कान्सूर येथील दोन दिंड्या एकत्र येत खतगव्हाणमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२०-२१ चा विमा मिळावा या मागणीसाठी चूलबंद आंदोलन करत गावातून दिंडी काढत अनोखे आंदोलन करण्यात आले.
--------
शासन उदासीन
जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी ओळखला जातो. आर्थिक अडचण असतानाही या शेतकरऱ्यांनी पीकविमा भरलेला आहे. मात्र, शासनाच्या उदासीन आणि विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. कृषिदिनी शेतकऱ्यांना अन्नत्याग, चूलबंद आंदोलन करावे लागत आहे.
-गंगाभीषण थावरे, शेतकरी संघर्ष समिती
010721\purusttam karva_img-20210701-wa0026_14.jpg